Breaking News

माथेरानमध्ये जनजीवन पूर्वपदावर; पर्यटकांचे मात्र हाल

कर्जत : बातमीदार

सतत पाच दिवस पडत असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे माथेरानचे जनजीवन पूर्णतः ठप्प होऊन, जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत होते. येथे आलेल्या पर्यटकांना अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागले. जोरदार पावसामुळे रात्रीच्या वेळेस घरात पाणी शिरल्याने एक महिला जखमी झाली आहे. आता माथेरान पूर्वपदावर येत असून पावसाचा जोर कायम असल्याने पर्यटकांचे मात्र हाल होत आहेत.

2636 फूट उंचीवर असलेल्या माथेरानमध्ये दरवर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान 3200च्या सरासरीने पाऊस पडतो. यावर्षी मात्र फक्त सात दिवसांत 1310 मिमी पाऊस झाला असून, दोन महिन्यांतच पाऊस सरासरी गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. 26 जुलै 2005 नंतर या वर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. या पावसात पर्यटकांचे हाल झाले. सर्वत्र दाट धुके, अतिमुसळधार पाऊस यामुळे इच्छित स्थळी जाण्यासाठी वाहनही उपलब्ध नसल्याने पर्यटकांची फारच दमछाक झाली. पर्यटकांसह स्थानिकांचीही या पावसात त्रेधातिरपिट उडाली. 21 तारखेच्या मध्यरात्री लोक झोपेत असताना मुस्लिम मोहल्ल्यातील तीन घरांत पाणी शिरले. माथेरानमध्ये उतार असल्याने स्वाभाविक पाण्याचा निचरा त्वरित होतो, त्यामुळे घरात पाणी शिरण्याची ही पहिलीच वेळ आहे. येथील एका सेनेटोरियमवर महाकाय झाड कोसळले, मात्र जीवितहानी झाली नाही. 54 दिवसांत 2940 मिमी पावसाची नोंद झाली असून रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस माथेरानमध्ये झाला आहे.

आपत्ती व्यवस्थापन कागदावरच

सतत कोसळत असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे लोक एकमेकांना धीर देताना दिसत होते, मात्र आपत्ती व्यवस्थापन कुठेही कार्यरत असताना दिसले नाही. मुस्लिम मोहल्ल्यातील लोकांनी सांगितले की पाण्याचा लोंढा आमच्या घरामध्ये आला. शेजार्‍यांनी मदत केली, पण आपत्ती व्यवस्थापनाचे कोणीही मदतीला आले नाही. शेवटी शेजारी आणि लहान मुलांच्या मदतीने पहाटे साडेपाचपर्यंत पाणी काढले. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कागदावरच आहे का, असा सवाल या नागरिकांमधून विचारला जात आहे.

रुग्णवाहिका नादुरुस्त

घरात शिरलेल्या पाण्याचा उपसा करत असताना महिलेला दुखापत झाली. नगर परिषदेच्या रुग्णवाहिकेसाठी फोन लावला असता महाराष्ट्र शासनाची 108 आणि नगर परिषदेची रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. नेरळहून तत्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना हॉस्पिटलला नेले, असे रिजवना शेख यांनी सांगितले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply