Sunday , February 5 2023
Breaking News

तिसर्या लाटेला रोखण्याची नवी मुंबईत तयारी

सात मजली इमारत व पाचशे रुग्णशय्या पालिका घेणार ताब्यात

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेपेक्षा तिसरी लाट ही जास्त त्रासदायक राहणार असल्याचा इशारा केंद्रीय तसेच राज्य आरोग्य विभागाने दिल्याने नवी मुंबई पालिकेने कोणत्याही क्षणी येणार्‍या या तिसर्‍या लाटेची तयारी ठेवली आहे. त्यासाठी बेलापूर येथील एक सात मजल्यांची इमारत व खारघर येथे बांधून तयार असलेले पाचशे रुग्णशय्यांचे रुग्णालय ताब्यात घेणार आहे. त्या संदर्भात करारनाम्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे.

नवी मुंबई पालिकेने दुसर्‍या लाटेसाठी केलेली तयारीची प्रशासकीय पातळीवर प्रशंसा केली गेली आहे; पण या काळात अतिदक्षता विभागातील रुग्णशय्या कमी पडल्याची तक्रार होती.जागतिक आरोग्य संस्थेने तिसरी लाट सुरू झाल्याचे संकेत दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तिसर्‍या लाटेला रोखण्याचे आवाहन जनतेला केले आहे. देशातील नागरिकांचा सुरू झालेला मुक्त संचार याला कारणीभूत असून पर्यटन स्थळांवर पावसाळी सहलीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू लागली आहे. बाहेर पडणार्‍या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने तिसरी लाट अपरिहार्य असल्याचे आरोग्य विभागातील अधिकार्‍यांचे मत आहे. त्यामुळे स्थानिक संस्थांनी तिसर्‍या लाटेची तयारी सुरू केली आहे.

नवी मुंबई पालिकेने दुसर्‍या लाटेत काळजी केंद्रातील रुग्णशय्यांची संख्या पाच हजारांपर्यंत नेली होती, तर ऑक्सिजन रुग्णशय्या दीड हजारांपर्यंत होती. प्राणवायू रुग्णशय्यांची पालिकेची तयारी मात्र दोनशे रुग्णशय्यांपर्यंत होती. त्यामुळे हा तुटवडा जाणवत होता. त्यानंतर पालिकेने वाशी येथील कोविड काळजी केंद्रातच प्राणवायू प्रणालीच्या 75 रुग्णशय्यांची व्यवस्था तातडीने केली होती. खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे नियंत्रण पालिकेने आपल्या हाती घेऊन स्थानिक रुग्णांना 80 टक्के प्राधान्य देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे दुसर्‍या लाटेतील दिवसागणिक होणारी दीड हजार रुग्णांची संख्या कमी होऊ लागली होती. दोन लाटांतील अनुभवावरून नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे ही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असून कडक निर्बंध लागू करावे लागणार आहेत.

पालिकेने आरोग्य विभागाच्या सायंकालीन आढावा बैठका पुन्हा सुरू केल्या असून दुसर्‍या लाटेपेक्षा तिसरी लाट आरोग्य विभागाच्या दृष्टीने आव्हानात्मक असल्याने पालिकेने कोविड काळजी केंद्राबरोबरच रुग्णालयांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बेलापूर येथील एक बांधून तयार असलेली, मात्र भोगवटा प्रमाणपत्र नसलेली सात मजल्यांची इमारत ताब्यात घेण्यात आली आहे. पालिकेच्या पनवेल येथील इंडिया बुल्स इमारतीतील काळजी केंद्रावर टीका झाल्याने शहरापेक्षा पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या इमारतीपेक्षा बेलापूर येथील सात मजली इमारत कोविड काळजी केंद्रासाठी वापरली जाणार असून या ठिकाणी दोनशेपेक्षा जास्त रुग्णांची काळजी घेणे शक्य होणार आहे.

रुग्णांना दिलासा

पालिकेने या ठिकाणी रुग्णांना आवश्यक असलेल्या सुविधांची उभारण्यास तयारी सुरू केली आहे. याशिवाय खारघर येथील येरळा हे आयुर्वेदिक महाविद्यालयदेखील सिडकोबरोबर असलेल्या एका वादामुळे अडकून पडलेले होते, मात्र तो अडथळा दूर झाल्याने हे रुग्णालय पालिका समर्पित कोविड रुग्णालयासाठी ताब्यात घेणार असून या रुग्णालयाला त्याचा भाडेपट्टा मिळणार आहे. तिसर्‍या लाटेची पालिकेने अशा प्रकारे तयारी सुरू केल्याने शहरातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply