पुणे ः प्रतिनिधी
अर्जुन पुरस्कार विजेते माजी बॅडमिंटनपटू आणि 1960च्या दशकात भारतीय क्रीडा क्षेत्राला उंचीवर नेणारे नंदू नाटेकर यांचे वृद्धत्वाने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. मूळचे सांगलीचे असणार्या नंदू नाटेकर यांनी बॅडमिंटनमध्ये भारताचे नाव जागतिक स्तरावर नेले होते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवणारे ते भारतातील पहिले खेळाडू होते. नंदू नाटेकर यांनी पुरुष एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरीत राष्ट्रीय स्पर्धाही जिंकल्या होत्या. ऑल इंग्लंड या आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेत त्यांनी क्वार्टर फायनलपर्यंत मजल मारली होती. नंदू नाटेकर यांनी अन्य खेळांमध्येही प्राविण्य मिळवले होते. क्रिकेट, टेनिसमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावरदेखील चांगली कामगिरी केली होती. याशिवाय 1960च्या दशकात जाहिरात क्षेत्रातही त्यांनी मोठी मजल मारली होती. नाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त होत आहे.