भाजप आमदार रमेश पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
नवी मुंबई ः बातमीदार
कोपरखैरणे (चिकणेश्वर बसस्थानक) तीन टाकी ते ठाणे व्हाया तळवली, गोठवली, राबाडा गावमार्गे पटणी रोड अशी बससेवा नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाने सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ही बस सुरू करण्याबाबत भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला यश आले असून विद्यार्थ्यांच्या पालकांनी आमदार रमेश पाटील यांचे आभार मानले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमामार्फत संपूर्ण शहरामध्ये प्रवाशांना उत्तम सेवा देण्यात येत आहे. परिवहन उपक्रमामध्ये आधुनिक पर्यावरणपूरक बसेस उपलब्ध असून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे काम त्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना, विद्यार्थ्यांना, उपयोगी ठरणारी ही बससेवा शहरातील विविध मार्गांवर चांगल्या प्रकारे सुरू आहे, परंतु गेल्या काही दिवसांपासून कोपरखैरणे (चिकणेश्वर बसस्थानक) तीन टाकी ते ठाणेमार्गे तळवली, गोठवली, राबाडा गावमार्गे पटणी रोड अशी बससेवा सुरू करण्याची या मार्गावरील स्थानिक रहिवाशांची व विद्यार्थ्यांची मागणी आमदार रमेश पाटील यांच्याकडे सातत्याने होत होती. त्या अनुषंगाने आमदार रमेश पाटील यांनी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाला पत्रव्यवहार करून सदरच्या मार्गावर शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता बससेवा सुरू करण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीनुसार कोपरखैरणे (चिकणेश्वर बसस्थानक) तीन टाकी ते ठाणे व्हाया तळवली, गोठवली, राबडा गावमार्गे पटणी रोड या मार्गावर अखेर जुलै महिन्यापासून बससेवा सुरू करण्यात आली आहे. आमदार रमेश पाटील यांनी त्यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार सदरच्या मार्गावर बससेवा सुरू करून दिल्याबद्दल स्थानिक रहिवाशांनी व विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले.