पनवेल : वार्ताहर
शिपिंग क्षेत्रात नोकरीचे आमिष दाखवून अनेक तरुणांची आर्थिक फसवणूक केली जाते. याबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लक्ष घालून योग्य मार्गदर्शन करावे व उपाय योजना करावी, अशी मागणी ऑल इंडिया सिफेरर्स युनियनच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन केली आहे.
या वेळी ऑल इंडिया सिफेरर्स युनियनचे अध्यक्ष संजय वासुदेव पवार, कार्याध्यक्ष अभिजित सांगळे, खजिनदार शितल मोरे आणि प्रदेशाध्यक्ष (महाराष्ट्र राज्य) अफजल देवळेकर आदींनी राज्यपालांची भेट घेतली.
सिफेरर्स बांधवांच्या समस्या, त्यांची होणारी फसवणूक, लसीकरण अशा अनेक विषयांवर या वेळी चर्चा झाली. राज्यपालांनीही सकारात्मक प्रतिसाद देत समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचे युनियनला आश्वासन दिले.