आज मी जरी सहकार क्षेत्रामध्ये अनेक पदांवर काम करीत असलो तरी माझ्या सहकारामधील कामगिरीचे बीज मात्र पन्नास वर्षांपूर्वी आम्ही स्थापन केलेल्या वाल्मिकी सहकारी मच्छीव्यावसायिक संस्थेमध्येच आहे. 02 ऑगस्ट 1971 रोजी स्थापन झालेल्या या संस्थेला आज बघताबघता 50 वर्ष पूर्ण झाली. आज या निमित्ताने गेल्या पन्नास वर्षामधील सा-या घटना झर्रकन् आठवल्या.
मी मुळचा कोपर ता.पेण येथील रहिवासी. गावात बहुतेकांचा मासेमारी हाच मुख्य व्यवसाय. पूर्वीच्या काळी मच्छीमारी यांत्रिक पध्दतीने होत नसे. आजकाल दिसणारे ट्रॉलर्स फारच अभावाने असत. प्रामुख्याने डोल पध्दतीनेच मासेमारी केली जायची. माझे वडील कै.तुकाराम पाटील यांनी काळाची पावले ओळखली होती. त्याप्रमाणे त्यांनी ट्रॉलर घेण्याचे ठरवले. नौका, इंजिन, जाळी व इतर सामुग्रीसाठी 1 लाखाहून अधिक रूपयांची आवश्यकता होती. आता पन्नास वर्षांपूर्वी एवढी रक्कम उभी करणे सोपे काम नव्हते.
तसंही सरकारच्या न्यु पॅटर्न योजनेअंतर्गत 100 टक्के अर्थसहाय्य मिळत असे. शिवाय त्यावर 50 टक्के सरकारी अनुदानही मिळे. परंतु या योजने अंतर्गत अर्थसहाय्य फक्त मच्छीव्यावसायिक सहकारी संस्थेमार्फतच दिले जाई. कोपर गावात सहकारी संस्था नसल्याने आम्हाला या योजनेचा फायदा मिळू शकत नव्हता.
वडीलांनी त्याकाळातील मच्छीमार नेते भाई बंदरकर यांची भेट घेतली. भाईंनी सल्ला दिला की, असं असलं तरी जिल्हा मच्छीमार सहकारी संघामार्फत या योजनेचा फायदा घेता येईल. त्यावेळी जिल्हा मच्छीमार सहकारी संघाचे अध्यक्ष नारायणराव भगत हे होते. त्यांना भेटण्यासाठी वडील अलिबागला आले. तेंव्हा मी अलिबागलाच कॉलेजमध्ये शिकत असल्याने वडीलांसोबत मीही भगतसाहेबांकडे गेलो. वडीलांनी भेटीचे प्रयोजन सांगितले आणि भगतसाहेबांना विनंती केली की, आमच्या गटाला न्यू पॅटर्न योजनेंतर्गत अर्थसहाय्य मिळण्यासाठी, जिल्हा मच्छीमार सहकारी संघाने शिफारस करावी. मात्र त्यावर भगत साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की, जिल्हा मच्छीमार संघ तुमच्या गटाची शिफारस करणार नाही. अर्थात त्यांनी उपायही सुचवला. ते म्हणाले की तुम्ही तुमच्या गावात मच्छीमार संस्थेची स्थापना करा व त्या संस्थेमार्फत अर्थसहाय्य मिळवा. मी अलिबागेतच असल्याने साहजिकच वडीलांनी संस्था स्थापनेची सारी जबाबदारी माझ्यावर सोपवली.
ब-याच जणांना माहीतही नसेल की त्या काळात मच्छीव्यावसायिक सहकारी संस्था नोंदणीचे अधिकार, जिल्हा परीषदचे सहकार व उद्योग अधिकारी यांना होते. अर्थात संस्थेच्या नोंदणीसाठी मत्स्यव्यवसाय खात्याच्या शिफारशीचीही आवश्यकता होती. त्याकाळात एखादी सहकारी संस्था स्थापन करणे, आजच्याएवढे सोपे नसे. संस्थेची उपविधी आम्ही श्री तुकाराम छापखाना, शाहुपूरी-कोल्हापूर यांचेकडून मागविली. सुरवातीला संस्थेचे कार्यक्षेत्र कोपर व खारपाडा ही पेण तालुक्यातील दोन गावे आणि डोलघर व केळवणे ही पनवेलमधील दोन गावे असेच होते. आज संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण रायगड जिल्हा आहे. संस्थेच्या नोंदणीसाठीचा खर्च फक्त 43 रूपये आणि 65 पैसे एवढाच झाला. नोंदणी करण्यासाठी म्हणून एक रूपयाचाही अवास्तव खर्च आला नाही हे विशेषकरून नमूद करावेसे वाटते. नोंदणीसाठी श्री. पांडेसाहेब, तत्कालीन अधिक्षक, मत्स्यव्यवसाय खाते आणि श्री. हंसराजसाहेब, सहकार व उद्योग अधिकारी, कुलाबा जिल्हा परीषद यांचे अतीशय मोलाचे सहकार्य लाभले.
संस्था स्थापन करण्यासाठीची म्हणून सर्व प्रवर्तकांची पहिली मिटींग दि.19/05/1971 रोजी पेण येथील भूविकास बँकेच्या कार्यालयात आयोजित केली गेली. अध्यक्षस्थानी पेणचे ड.मोहन गंगाराम पाटील होते. तर मार्गदर्शन करण्याकरीता आमदार दत्ता पाटील (दादा), सर्वश्री प्रभाकर पाटील (भाऊ), श्रीधर (गुरुजी) विष्णू पाटील आणि एकनाथ (गुरुजी) हरी पाटील तसेच 16 प्रवर्तक आणि चव्हाणसाहेब विस्तार अधिकारी (उद्योग) पंचायत समिती पेण हजर होते. मीही एक प्रवर्तक म्हणून होतोच. विशेष म्हणजे त्यावेळी दादाभाऊंशी माझा परीचयही नव्हता.
प्रथे प्रमाणे संस्थेचे नाव ठरवणे, इतर प्रवर्तक व मुख्य प्रवर्तकाची निवड करणे याबाबत निर्णय घेण्यात आले. संस्थेचे नांव काय यावर बराच खल झाला. नाव अर्थपूर्ण असावे आणि नावाला अनेक सामाजिक कंगोरे असणे महत्वाचे होतेच. चर्चेअंती भाऊंनी सुचविलेले नाव वाल्मिकी सर्वानुमते मंजूर करण्यात आले. मुख्य प्रवर्तक म्हणून मधुकर नागा पाटील यांचे नाव आणि माझ्यासह 13 प्रवर्तकांची निवड केली गेली. सभेचे कामकाज संपल्यावर भाऊंनी त्यांच्या नेहमीच्या रोखठोक भाषेत सर्वांना सांगितले की, या संस्थेचे वाल्मिकी हे नाव मी सुचविलेले आहे. वाल्याचा वाल्मिकी झाला. या वाल्मिकी संस्थेचा वाल्या होऊ देवू नका.
चला, सर्व फॉमलिटी तर पूर्ण झाल्या. संस्थेची नोंदणी करण्याकरीता रीतसर प्रस्ताव मी स्वत: सहकार व उद्योग अधिकारी, कुलाबा जिल्हा परीषद यांचेकडे दि.15/06/1971 रोजी सादर केला. विशेष म्हणजे केवळ दिड महिन्यातच उपविधी मंजूर होवून आम्हाला नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. माझ्या दृष्टीने महत्वाचे हे की माझा सहकार क्षेत्रामध्ये, अगदी अचानक म्हणावा असा प्रवेश झाला होता. त्यावेळी कोणी सांगितले असते की, याच सहकार क्षेत्रामध्ये मी विविध पदे भूषवणार आहे… तर माझाच विश्वास बसला नसता… कालाय तस्मै नमः हेच खरे! असो.
नियमाप्रमाणे नोंदणी झाल्यावर पहिली सर्वसाधारण सभा दि. 13/08/1971 रोजी संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी ग्रुप ग्रामपंचायत जोहे, ता.पेण चे आमच्या कोपरचे सदस्य बाळू कृष्णा पाटील हे होते. सर्वश्री वाय एच खैरनार, विस्तार अधिकारी (सहकार व उद्योग) पंचायत समिती पेण हे हजर राहीले.
सभेत सात सदस्यांची हंगामी समिती नेमण्यात आली. यामध्ये सर्वश्री मधुकर नागा पाटील, धर्माजी राघो पाटील, हसुराम कमल पाटील, गजानन माया कोळी, लक्ष्मण गोविंद भोईर, जनार्दन नारायण कोळी आणि मी स्वत: यांचा समावेश होता. सेक्रेटरी म्हणून अंबाजी कमळ पाटील यांचीही नेमणूक, मासिक रू. 40 पगारावर केली गेली. संस्थेच्या आजच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षात, मी स्वत: आणि लक्ष्मण भोईर, आम्हा दोघांशिवाय दुर्दैवाने आज कुणीही हयात नाही.
वाल्मिकी सहकारी मच्छीव्यावसायिक संस्थेचा प्रतिनिधी म्हणून अनेक ठिकाणी काम करण्याची संधी मला मिळाली.मी जिल्हा मच्छीमार संघाचा 1978-92 या कालावधीमध्ये संचालक होतो. 1984-92 मध्ये जिल्हा मच्छीमार संघाचा अध्यक्षही होतो. संस्थेचा प्रतिनिधी म्हणून मी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघाचा 1986-91 आणि नंतर 2004 पासून आजपर्यंत संचालक आहे. तीन वेळा मी राज्य संघाचा अध्यक्षही होतो. जिल्हा मच्छीमार संघ व राज्य मच्छीमार संघाचा प्रतिनिधी म्हणून मी राष्ट्रीय मच्छीमार सहकारी संघाचा नऊ वर्ष संचालक राहीलो. 1989-91 या कालावधीमध्ये मी राष्ट्रीय मच्छीमार संघाचा अध्यक्ष म्हणून काम पाहीले. शिवाय संस्थेचा प्रतिनिधी म्हणून मी रायगड जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचा संचालक म्हणून सुध्दा काम पाहीले.
माझ्या अध्यक्ष म्हणून कारकिर्दीमध्ये राष्ट्रीय मच्छीमार संघ तिनही वर्ष नफ्यातच चालला. अध्यक्ष या नात्याने र्डेीींह एरीीं रीळरप र्उेीपीींळशी च्या प्रतिनिधी करिता जपानमधील छरींळेपरश्र ऋशवशीरींळेप ेष ऋळीहशीळशी उे-ेशिीरींर्ळींश रीीेलळरींळेप (नएछॠधजठएछ) या संघाने 1989 मध्ये आयोजित केलेला जपानचा अभ्यास दौराही करण्याची संधी मिळाली.
अशा प्रकारे वाल्मिकी सह. मच्छीव्यावसायिक संस्थेचा प्रतिनिधी म्हणून मला जिल्हा, महाराष्ट्रच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी प्राप्त झाली. अगदी माझा पहिला विदेश अभ्यास दौरा जपानमध्येही जाण्याची संधी मिळाली. आणि म्हणूनच मी वाल्मिकी संस्थेचा कायमचा ऋणी राहीन.
(भारताच्या पूर्व पश्चिम विस्तिर्ण अशा किनारपट्टीवर वसलेला माझा कोळी बांधव, कायम प्रतिकूल निसर्गाशी लढत आलेला. सागराला दैवत मानणारा, सागरावर अपार प्रेम करणारा कोळी बांधव आज अनेक प्रकारच्या संकटांना धैर्याने तोंड देतोय. कधी मासळीचा दुष्काळ तर कधी समुद्र प्रदुषणामुळे होणारा त्रास, शिवाय वादळवारा ही संकटे कायमच पाचवीला पुजलेली. अशावेळी हा दर्याचा राजा मनाने खचून न जाता येईल त्या कठीण प्रसंगाला तोंड देत आजही ताठ मानेने उभा आहे. मला स्वत:ला याच गोष्टीचे नेहमी अप्रुप वाटते.
मच्छीमार संस्थांच्या संघटनांमध्ये राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर काम करताना, प्रामुख्याने मला मच्छीमारांच्या अनेक प्रश्नांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. पारंपारीक मासेमारी आता कालबाह्य झाली आहे. परंतु मच्छीमारांसाठी अर्थसहाय्य किंवा इतर अनुदान या नियमानांबद्दल आजही तितका आश्वासक बदल झालेला नाही. ग्लोबल वॉर्मिंगच्या धोक्यामुळे आज हवामान खूपच बेभरवशाचे झाले आहे. त्यासाठी हवामानाची अचूक माहिती देणारी यंत्रे व अत्याधुनिक बोटी याची फार गरज आहे.
मच्छीमारांसाठीचा जातीचा दाखला हा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. त्यासाठीही कायद्यामध्ये काही सकारात्मक बदल करणे अत्यावश्यक आहे. मच्छीमारांचे असे अनेक प्रश्न आहेत जे अजूनही तितकेसे मार्गी लागलेले नाहीत. सरकारी बाबूंची समाजाबद्दलची अनास्था असेल किंवा दप्तर दिरंगाई असेल, यात बदल होणे गरजेचे आहे. वाल्मिकी संस्थेचा प्रतिनिधी म्हणून या सर्व प्रश्नांचा अगदी जवळून तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास करण्याची संधी मला मिळाली.
वाल्मिकी सह. मच्छीव्यावसायिक संस्था अगदी स्थापनेपासून गेली 50 वर्ष कार्यरत आहे. या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने मला कै. भाऊंचे शब्द आठवतात. वाल्मिकीचा वाल्या होवू देवू नका असा प्रेमळ इशारा दिलेला आठवतो आणि मला सांगायला अतीशय आनंद आणि अभिमान वाटतोय की, आजपर्यंत वाल्मिकी संस्था वाल्मिकीच राहिली आहे.
-अॅड. जे. टी. पाटील, अलिबाग