माजी मंत्री विनोद तावडे यांचे प्रतिपादन
महाड : प्रतिनिधी
महापूरात महाडमधील व्यापार्यांचे शंभरटक्के नुकसान झाले आहे. या व्यापार्यांना आधार देण्यासाठी त्यांनी घेतलेल्या मालावरचा जीएसटी माफ करावा, अशी मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी (दि. 3) येथील व्यापार्यांच्या भेटीदरम्यान केले.
महाडमधील पूर परिस्थिती आणि नुकसानीची माहिती घेण्यासाठी माजीमंत्री विनोद तावडे मंगळवारी येथे आले होते. प्रथम त्यांनी कै. माणिकराव जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांनतर महाडमधील व्यापार्यांची भेट घेतली. या वेळी पूरग्रस्त व्यापार्यांचे विमा तात्काळ मिळावे, जीएसटी सवलत द्यावी, सावित्री नदी पात्रातील प्रवाहाला अडथळा ठरणारे जुटे तात्काळ काढावेत अशा प्रमुख मागण्या व्यापर्यांकडून करण्यात आल्या.
दरम्यान, तावडे यांनी, महाडमधील पूरग्रस्त व्यापार्यांच्या नुकसान झालेल्या मालावर घेतलेला जीएसटी माफ करावा तसेच जीएसटी परताव्याची मुदत सहा महिन्यासाठी वाढवून द्यावी अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचे या वेळी सांगितले. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय मेहता, प्रकाश माणिकचंद मेहता, दिनेश जैन, भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, तालुकाध्यक्ष जयवंत दळवी यांच्यासह महाडमधील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.