मुंबई ः प्रतिनिधी
भाजपने सातत्याने लावून धरलेली मागणी आणि जनतेचा टाहो अखेर ठाकरे सरकारच्या कानापर्यंत पोहचला असून पूरग्रस्तांसाठी सरकारी मदत जाहीर करण्यात आली. पूरग्रस्त भागातील मदत, दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी राज्य सरकारने 11 हजार 500 कोटींच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (दि. 3) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा जोरदार तडाखा बसला. या भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवित, तसेच वित्तहानीदेखील झाली होती. यानंतर मदतीची मागणी होत होती. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पूर-दरडग्रस्त भागांचा दौरा करून पाहणी केली होती. यानंतर फडणवीस यांनी आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी 26 मागण्यांचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते.