पनवेल : वार्ताहर
वाशी सेक्टर 9 मधील डोळ्यांचे डॉक्टर असल्याचे भासवून एका भामट्याने एका ज्वेलर्स मालकाकडून एक लाख रुपयांची रोख रक्कम लुबाडून पलायन केले आहे. वाशी पोलिसांनी या भामट्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेल्या ज्वेलर्स मालकाचे नाव बसंतीलाल ओस्तवाल (वय 55) असे असून त्यांचे वाशी सेक्टर 9 मधील रत्नदीप बिल्डिंगमध्ये नूतन ज्वेलर्स इंडिया प्रा.लि. नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. 5 ऑगस्ट रोजी एका भामट्याने बसंतीलाल यांना फोन करून त्यांच्या ज्वेलर्स दुकानाच्या बाजूला असलेल्या आय क्लिनिकमधील डॉ. निकम बोलत असल्याचे सांगितले. त्याच्या आईसाठी दोन सोन्याच्या बांगड्या बनवायच्या आहेत, असे सांगून त्यासाठी एक लाख रुपये अॅडव्हान्स देत असल्याचे व पैसे घेण्यासाठी कर्मचार्याला क्लिनिकमध्ये पाठवण्यास सांगितले. भामट्याने त्याच्याकडे बंदे दोन लाख रुपये असल्याचे सांगून एक लाख रुपये सुटे पैसे कर्मचार्याकडे पाठवून देण्यास सांगितले. त्यानुसार बसंतीलाल यांनी कर्मचारी भैरुसिंग राठोड याच्याकडे एक लाख रुपये देऊन डॉ. निकम यांच्या क्लिनिकमध्ये पाठवून दिले. भैरुसिंग क्लिनिकमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी भेटलेल्या भामट्याने स्वतः डॉ. निकम असल्याचे भासवून एक फ्लॅटचा दरवाजा उघडण्याचा बहाणा करून एक लाख रुपयांची रक्कम घेतली, तसेच फ्लॅटचा दरवाजा उघडल्यानंतर बांगड्या बनविण्यासाठी आईच्या हाताचे माप घेण्यास सांगून त्या ठिकाणावरून पलायन केले. काही वेळानंतर भैरुसिंगला सोबत आलेला व्यक्ती हा डॉ. निकम नसल्याचे समजल्यावर त्याने बसंतीलाल यांना सर्व घटना सांगितली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बसंतीलाल यांनी वाशी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.