Breaking News

तिरंग्याच्या अपमानाने देश दु:खी; दिल्लीतील हिंसाचारावर पंतप्रधान मोदींची नाराजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान प्रजासत्ताक दिनी आयोजित ट्रॅक्टर रॅलीत उफाळलेल्या हिंसाचारामुळे व लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 31) आपल्या मन की बात कार्यक्रमात भाष्य केले. दिल्लीत 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिनी) रोजी तिरंगी ध्वजाचा झालेला अपमान पाहून देश खूप दुःखी झाला, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधला. नवीन वर्षात होत असलेला हा पंतप्रधानांचा पहिलाच कार्यक्रम होता. त्यामुळे ते काय बोलतात विशेषत: दिल्लीतील घटनेबाबत काय भाष्य करतात याकडे देशवासीयांचे लक्ष लागले होते. ‘दिल्लीत शेतकरी आंदोलनामध्ये 26 जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाला. लाल किल्ल्यावर झेंडा फडकवला गेला. ही घटना राष्ट्रध्वजाचा अपमान करणारी आहे. या घटनेने देश अतिशय दुःखी आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. शेतीला आधुनिक स्वरूप देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि अनेक पावले उचलत आहे. सरकारचे प्रयत्न सुरूच राहतील, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्याला येणार्‍या काळाला नवीन आशा व नाविन्याने भरायचे आहे. आपण मागील वर्षी असाधारण संयम व धैर्याचा परिचय दिला. या वर्षातदेखील कठोर मेहनत घेऊन आपल्याला संकल्प पूर्ण करायचे आहेत. आपल्या देशाला अधिक गतीने पुढे न्यायचे आहे. कोरोनाविरुद्ध देशभरात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, अवघ्या 15 दिवसांत भारताने 30 लाखांहून अधिक लसीकरण केले आहे, तर अमेरिकेसारख्या श्रीमंत देशाला 18 दिवस आणि ब्रिटनला 36 दिवस लागले. कोरोनाविरुद्ध भारताची लढाई एक उदाहरण बनली, तशीच आता आपली लसीकरण मोहीमदेखील जगात एक उत्तम उदाहरण बनत आहे.

टीम इंडियाचे कौतुक

भारताने ऑस्ट्रेलियात केलेल्या ऐतिहासिक कामगिरीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये घेतली. या महिन्यात क्रिकेटच्या मैदानावरून चांगली बातमी मिळाली. आपल्या क्रिकेट संघाने सुरुवातीच्या अडचणींवर मात करीत शानदार पुनरागमन केले आणि ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली. खेळाडूंची मेहनत आणि एकता प्रेरणा देणारी आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाचे कौतुक केले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply