रस्त्याला संरक्षक भिंत बांधण्याची मागणी
कर्जत : बातमीदार
नेरळ एसटी स्टँडकडे जाणार्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. त्यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मातीचा भराव टाकून साईडपट्टी बनविण्यात आली होती. मात्र जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत माती वाहून गेल्याने या रस्त्याची साईडपट्टी पूर्णपणे खचली आहे.दरम्यान,रस्त्याच्या खालील भागात रायगड जिल्हा परिषदेने संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी कोल्हारे ग्रामपंचायतचे सदस्य आणि जय मल्हार रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष विजय हजारे यांनी केली आहे.
नेरळ-कळंब रस्त्यावरून नेरळ एसटी स्थानक कडे जाणारा रस्ता आहे.तोच रस्ता पुढे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नेरळ रेल्वे स्थानक जाणारा रस्ता आहे.तेथील खराब रस्ता अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सुमारे 85 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता.रस्त्याचे काम करणार्या ठेकेदाराने मातीचा भराव टाकून साईड पट्टी बनविण्यात आली होती.जुलै महिन्यात आलेल्या महापूराचे पाणी सर्व परिसरात मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त पसरले होते.त्या पुराच्या पाण्यात रस्त्याच्या बाजूची माती वाहून गेली आणि पूर्ण साईडपट्टी वाहून शेतात गेली आहे. रस्त्याला साईडपट्टीच उरली नाही. त्यामुळे या रस्त्यावर प्रवास करताना धोका निर्माण झाला आहे. साईडपट्टी नसल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात कोसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे या रस्त्यावर साईडपट्टी तयार करून संरक्षक भिंत उभारावी अशी मागणी प्रवासी आणि वाहन चालकांकडून केली जात आहे.या भागातून प्रवासी वाहतूक करणार्या नेरळ एसटी स्टँड येथील जय मल्हार रिक्षा संघटनेचे अध्यक्ष विजय हजारे यांनी संपूर्ण रस्त्याला संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी रायगड जिल्हा परिषदेकडे केली आहे.नेरळ विकास प्राधिकरण मधून निधी मिळावा यासाठी या ग्रामपंचायतचे सदस्य हजारे यांनी पत्र दिले आहे.