Breaking News

खोपोली शिळफाटा येथील इंदिरा गांधी चौक बनतेय अपघाताचे केंद्र

खोपोली : प्रतिनिधी

खोपोली शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना, रस्ते मात्र अरुंद आहेत.  टपर्‍या, हातगाड्यांच्या अतिक्रमणामुळे येथील रस्ते दिवसेंदिवस अपघातग्रस्त बनत आहेत.  शिळफाटा परिसरातील इंदिरा गांधी चौक तर अपघाताचे केंद्र बनत आहे.

खोपोली शहरातून मुंबई – पुणे जुना महामार्ग जातो. यात खंडाळा घाटातून शिळफाटा येथून मुंबई दिशेने जाणार्‍या एकेरी रस्त्यावर रायगड बाजार ते इंदिरा गांधी चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात जेसीबी, हायड्रो, ट्रक उभे असतात. यापूर्वी या भागात अनेक मोठे गंभीर अपघात होऊन वित्त आणि जीवितहानी झाली आहे. त्याकडे या परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी तसेच प्रवाशांनी शासनाकडे लक्ष वेधले, निवेदने दिली. पण शासनाच्या संबंधित विभागाने आतापर्यंत त्याकडे दुर्लक्ष केल्याने येथील नागरिकांमध्ये  असंतोष खदखदत आहे.

इंदिरा गांधी चौकाच्या दोन्ही बाजूला रिक्षा स्टँड आहेत. पण या स्टँडवर वाहनांची किती संख्या असावी याबाबत अद्यापही वाहतूक विभागाचे निश्चित धोरण ठरलेले दिसत नाही. परिणामी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात रिक्षा उभ्या असतात. यामुळेही अपघाताची शक्यता आहे.

या भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक गॅरेज आहेत, टपर्‍याही अनधिकृत उभे आहेत. त्या गॅरेजचे सामान याच परिसरात अस्तव्यस्त पडलेले असते. त्यामुळे या भागात भविष्यत मोठा अपघात झाला तर खुपच मोठी जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. मात्र खोपोली नगरपालिका, स्थानिक पोलीस तसेच रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी एकमेकांकडे बोटे दाखवून जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या नेहमीच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जनआंदोलन करण्याची तयारी केली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply