कर्नाळा पक्षी अभयारण्यातील वन्यजीव असुरक्षित; महामार्गावर प्राण्यांचे वारंवार अपघात
पनवेल : रामप्रहर वृत्त
कर्नाळा पक्षी अभयारण्य परिसरात प्राणी सुरक्षित नसल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. अभयारण्यातील प्राण्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारच्या अंतर्गत करोडो रुपये खर्च करून मुंबई-गोवा महामार्गावर प्राणी येणार नाहीत यासाठी महामार्गाच्या दुतर्फा प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत, परंतु या उपाययोजना तांत्रिकदृष्ट्या फोल ठरल्याने पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात मुक्या प्राण्यांचा जीव जात आहे.
शनिवारी (दि. 21) दुपारी अभयारण्य परिसरात एका अज्ञात वाहनाने माकडाला धडक देऊन तिथून निघून गेला. या धडकेत माकड गंभीररित्या जखमी होऊन रस्त्याच्या मधोमध पडून होते. याच दरम्यान पनवेलकडून पेणच्या दिशेने येत असलेले सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी पाहिल्यानंतर थांबून माकडाला रस्त्याच्या कडेला नेले आणि वन अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतू संपर्क न होऊ शकल्याने शेवटी कर्नाळा अभयारण्याच्या कार्यालयात गेले असता वन परिक्षेत्र अधिकारी उपलब्ध नसल्याचे समजले. त्यानंतर तेथे उपलब्ध असलेले वन रक्षक राठोड यांना तत्काळ जखमी माकडावर उपचार करण्याची विनंती केली असता जखमी माकडाला पकडण्यासाठीचे साहित्य नसल्याचे सांगितल्याने कर्नाळा अभयारण्यातच प्राणी सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होत आहे.
अभयारण्याच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करून अटी आणि शर्ती ठरवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अभरण्यामधून जाणार्या महामार्गाभोवती ध्वनीरोधक लावण्याबरोबरच वानर आणि माकडांना महामार्ग ओलांडण्यासाठी पूल बांधण्यात आला आहे. महामार्गावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेता अभयारण्यातील माकडांना महामार्ग ओलांडून पलीकडे जातांना अपघात होऊ नये म्हणून ’मंकी लॅडर’ बांधण्यात आला आहे. माकडांनीदेखील या लॅडरचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. या पुलावरून माकडांना रस्त्याच्या एका बाजूने दुसर्या बाजूस जाण्यासाठी व सुरक्षितरित्या रस्ता ओलांडण्यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडांना मंकी लॅडरच्या साहाय्याने जोडले आहे. तसेच महामार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांनी माकडांना खाऊ न घालण्याचे आवाहन केले असतानाही काही बेशिस्त नागरिक प्राणिप्रेमाचा आव आणतात आणि रस्त्यातच गाडी उभी करून माकडांना खाद्यपदार्थ खाऊ घालतात. यामुळे अनेकदा माकडे रस्त्यावर आल्याने त्यांचे अपघात घडून इजा होते तर अनेकदा माकडाचे प्राणही जातात. त्यामुळे अशा नागरिकांवर वनविभागाने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. जेणेकरून अपघातांचे प्रसंग घडणार नाहीत व वन्यजीव सुरक्षित राहतील.
वनविभागाने महामार्गावर जे प्रवासी प्राण्यांसाठी खाद्यपदार्थ टाकतात त्यांच्यावर कारवाई करण्याची वारंवार मागणी होत असतानाही कर्नाळा अभयारण्य वनपरिक्षेत्र अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळेच अभयारण्यातील प्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे.
-संतोष ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते