Breaking News

राज ठाकरेंची कॅसेट चालणार नाही : आ. भरत गोगावले

महाड : महेश शिंदे

राज ठाकरे यांच्या भाषणाने मतदारांवर काही फरक पडणार नाही. त्यांच्या महाडमध्ये झालेल्या सभेला मनसेचे कार्यकर्ते किती होते हे सर्वांनी पाहिले आहे. या भागात मनसे औषधालाही शिल्लक नाही. राज ठाकरेंची तीच तीच रेकॉर्डची कॅसेट घासली गेली आहे. ही कॅसेट चालणार नाही, अशा शब्दांत शिवसेना

आमदार भरत गोगावले यांनी शरसंधान साधले. ‘रामप्रहर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध विषयांवर आपली रोखठोक मते मांडली.

कोणत्या मुद्द्यांवर युती रायगडची लोकसभा जिंकणार, असे विचारले असता आमदार गोगावले म्हणाले की, पहिला मुद्दा देश संरक्षणाचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने सर्जिकल आणि एअर स्ट्राईक करून पाकिस्तानसह दहशवादाला चपराक लगावली, त्याला इतर देशांनीही साथ दिली. आज देशातल्या सर्वसामान्य जनतेची हीच भावना आहे की, मोदीच पंतप्रधान व्हावेत आणि त्यासाठी त्यांचे शिलेदार हे लोकसभेत पाठविणे गरजेचे आहे. म्हणून ना. अनंत गीतेंना निवडून द्या, असे आवाहन आम्ही करीत आहोत.

विरोधक म्हणतात गीते निष्क्रिय खासदार आहेत याबाबत आपण काय सांगाल यावर बोलताना, गीते निष्क्रिय आहेत मग 2014मध्ये तटकरे का पडले? सलग सहा वेळा गीतेंना जनतेने का निवडून दिले? विरोधकांची निष्क्रियतेची व्याख्या काय आहे असे प्रतिप्रश्न आमदार गोगावलेंनी केले. ते पुढे म्हणाले की, रायगड संवर्धनाचा 650 कोटींचा प्रकल्प व त्या अनुषंगाने 21 गावांचा होत असलेला विकास छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने 50 वर्षे सत्ता भोगलीत तेव्हा तुम्हाला दिसला नाही का? महाड-रायगड महामार्गचे काम, पाचाड-निजामपूर-इंदापूर मार्ग, महाड-लाटवण रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव आंबवडे ते महाड या महामार्गाचे काम, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण, सावित्री पुलाची रेकॉर्डब्रेक उभारणी, जलसिंचनाची कामे, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सडक योजनेची तालुक्यातील कामे, वीरपर्यंत रेल्वेचे दुपदरीकरण हा विकास युतीच्या काळात ना. गीते यांच्याच नेतृत्वाखालीच झाला आहे. 15 वर्षे तुम्ही खुर्च्या उबवल्यात, तुम्ही काय केलेत, असा सवालही त्यांनी केला.

सुनील तटकरे यांनी जलसिंचनामध्ये 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. रायगड जिल्ह्यातील काळकुंभे जलविद्युत प्रकल्प, बाळगंगा, कोंढाणे अशा सहा ते सात धरणांच्या कामांच्या किमती वाढवून त्यात पैसे खाल्ले. या तटकरेंमुळेच त्या अधिकारी आणि ठेकदारांना जेलची हवा खावी लागली. हा सर्व भ्रष्टाचार पाच वर्षांपूर्वी शेकापच्या जयंत पाटलांनी शोधला. त्याची श्वेतपत्रिका काढायला लावली. तटकरेंच्या 30 ते 32 बेनामी कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या नावे हजारो एकर जमीन शेतकर्‍यांकडून कवडीमोल दराने बळकावल्या आहेत. या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तटकरे मागच्या वेळी पडले व या वेळीही पडतील, असे आमदार गोगावले म्हणाले.

गीतेंच्या विजयासाठी भाजपसह आरपीआय आणि इतर दलित संघटना कामाला लागल्या आहेत. मुस्लिम लोकही मोठ्या संख्येने पाठीशी आहेत, कारण त्यांना खात्री पटली आहे की, शिवसेना जातीभेद करीत नाही. उलट काँग्रेसने कायम मुस्लिमांना भीतीच्या छायेत ठेवले, मागास ठेवले. हे आता या समाजाला समजले आहे, असे आमदार गोगावलेंनी नमूद केले.

महाआघाडीतील नेत्यांनी सत्ता या वैयक्तिक स्वार्थासाठी आघाडी केली आहे. शेकाप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मनोमन इच्छा आहे की तटकरे पडावेत. गीते साहेबांनी कधीच कोणाला त्रास दिला नाही, जनमानसात त्यांच्याबद्दल आदर आहे आणि आम्ही काम करताना कधीच पक्ष बघितला नाही. त्यामुळे आघाडीचाही कार्यकर्ता गीतेंनाच मतदान करेल, असा दावा आमदार गोगावले यांनी केला.

विकासकामांच्या जोरावर या वेळी गीते साहेब 25 ते 30 हजार मतांच्या फरकांनी निवडून येतील, असा विश्वास आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघातून गीतेंना पाच हजारांचे मताधिक्य मिळेल. दापोलीमध्ये 30 हजारांचे मताधिक्य मिळेल. महाड मतदारसंघात 30 हजार, पेणमधून आठ हजारांची आघाडी मिळेल. केवळ अलिबाग आणि श्रीवर्धन मतदारसंघात प्रत्येकी पंधराशे मतांनी मागे राहू, असा अंदाज असला, तरी त्या भागातील महाआघाडीतील गटबाजी आम्हाला फायद्याची ठरेल, असे आमदार गोगावले यांनी म्हटले. आम्ही पक्षाला आणि तत्त्वाला मानणारे सैनिक आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वावर जनतेचा पूर्ण विश्वास आहे. या विश्वासानेच जनता ना. अनंत गीते यांना भरघोस मतांनी निवडून देईल, असे शेवटी आमदार गोगावले यांनी अधोरेखित केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply