वृक्ष गणेशमूर्तींची मागणी अधिक
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
बाजारात या वर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती दाखल झाल्या आहेत. यात शाडूच्या मूर्तींबरोबर कागदी लगद्यापासून बनविलेल्या मूर्तीही आहेत, मात्र यंदा आकर्षण ठरत आहेत त्या वृक्ष गणेशमूर्ती. त्या लाल मातीपासून बनविण्यात आल्या असून कुंडीसह दिल्या जात आहेत. त्यांचे घरीच त्या कुंडीत विसर्जन करता येणार असून त्यापासून एक झाड तयार होणार आहे.
मागील तीन वर्षांपासून नागरिकांचा पर्यावरणपूरक गणेश मूर्ती खरेदीकडे कल वाढला आहे. त्यामुळे मूर्तिकारांनी या वर्षी बाजारात पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. विक्रेत्यांनीही शाडू, कागदी लगद्यापासून तसेच लाल मातीच्या वृक्ष गणेशमूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत. शाडू व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या तुलनेत या गणेशमूर्ती वजनाने हलक्या आहेत. वृक्षमूर्ती लाल माती चाळून पाण्यात मिसळून मूर्तीला आकार देण्यात येतो. या मूर्ती काही विक्रते कुंडीसहित त्यात ‘बी’ टाकून देत आहेत. या मूतींचे त्या कुंडीत किंवा घरीच विसर्जन करता येणार असून त्यापासून एक झाड तयार होणार आहे. त्यामुळे त्या मूर्तींना वृक्षमूर्ती असे बोलले जात जात आहे. पर्यावरणसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.
आम्ही यंदा 98 टक्के पर्यावरणपूरक मूर्ती बनविल्या आहेत. यामध्ये शाडूच्या मूर्ती 90 टक्के असून लाल माती आणि कागदी लगद्यापासून बनविलेल्या उर्वरित मूर्ती आहेत. या वर्षी फक्त दोन टक्के पीओपीच्या मूर्ती उपलब्ध असल्याचे वाशी येथील नमस्कार श्री मूर्ती केंद्राचे मयूरेश लोटलीकर यांनी सांगितले.
रंग, शाडू मातीचे दर तसेच वाहतूक खर्च दुपटीने वाढला आहे. त्यामुळे यंदा मूर्तींच्या दरात 15 ते 20 टक्के वाढ झाली आहे. शाडूच्या मूर्ती तीन ते सहा हजार रुपये, कागदी मूर्ती अडीच ते पाच हजार रुपये तर लाल मातीच्या मूर्ती 2500 ते 3000 रुपयांना उपलब्ध आहेत.
कोरोनामुळे पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची नागरिकांची अधिक मागणी आहे. घरी विसर्जन करता येतील अशा मूर्ती उपलब्ध करून दिल्या आहेत. शाडू व कागदापासून बनवलेल्या मूर्तींबरोबर यंदा लाल मातीच्या वृक्ष गणपती मूर्तीही आहेत. आम्ही या मूर्ती अधिक प्रमाणात ठेवल्या आहेत.
-पंकज घोडेकर, विक्रेते, श्री सदगुरू कृपा आर्ट, नवी मुंबई
पुठ्ठा, कापड, कार्डबोर्डच्या मखरांसह सजावटीचे साहित्य बाजारात दाखल
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
गणेशोत्सवाची लगबग बाजारात सुरू झाली असून सजावटीचे साहित्य दाखल झाले आहे. यावर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीबरोबर सजावट साहित्यही पर्यावरणपूरक दिसत आहे. थर्माकॉल वापरावर बंदी असल्याने बाजारात लाकडी, सन बोर्ड, पुठ्ठा, वेलवेट कापडी, कार्डबोर्ड पेपर, रबर सीट यापासून बनवलेले पर्यावरणपूरक मखर आले आहेत.
थर्माकॉलच्या मखरांपेक्षा या पर्यावरणपूरक मखरांच्या किमती अधिक आहेत. साधरण तीन पट किमती वाढल्या आहेत. या प्रकारचे मखर बनविण्यासाठी लागणारे साहित्य, कारागीर, मेहनत जास्त लागत असल्याने दर अधिक असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव सजावट साहित्य तसेच विविध कलाकुसर केलेले मखर ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मखर 1600 रुपयांपासून आठ हजारांपर्यंत उपलब्ध आहेत. या मखरांना अधिक पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. आत्तापर्यंत दहा टक्के मखर विकले गेले आहेत. मागणीनुसार मखर तयार करून ठेवण्यात आले असून 25 ते 30 टक्के मागणी राहील असे कारागिरांनी सांगितले. आतमधून पुठ्ठा आणि सजावटीसाठी विविध रंगाचे कार्ड बोर्ड पेपर वापरून हे मखर तयार करण्यात आले आहेत. त्यावर विविध प्रकारच्या लेस, मणी लावून सजावट करण्यात आली आहे, असे मखर विक्रते शहाजी पाटील यांनी सांगितले.
दोन वर्षांपासून बाजारात पर्यावरणपूरक मखर दाखल होत आहेत, मात्र गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादूर्भाव अधिक होता. आता कोरोना रुग्ण संख्या कमी आहे. त्याअनुषंगाने जेवढी मागणी असेल तेवढेच मखर बनवण्यात येत आहेत. पर्यावरणपूरक मखर महाग असले तरी त्याला मागणी आहे.
-नवीन नागरा, मोरया आर्ट, मखर विक्रेता