Breaking News

कळंबोलीतील जम्बो कोविड सेंटर सप्टेंबर महिन्यात होणार कार्यान्वित

पनवेल : रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणीमुळे कळंबोली येथे जम्बो कोविड सेंटर कार्यान्वित होत आहे. कळंबोली येथील जम्बो कोविड सेंटरचे काम सिडकोने पूर्ण केले असून तसे पत्र त्यांनी पनवेल महापालिकेला दिले आहे. या केंद्राचे लवकरच पालिकेकडे हस्तांतरण करण्यात येणार असून तिसर्‍या लाटेत या केंद्राचा मोठा आधार पनवेलकरांना मिळणार आहे.
सिडकोने गेल्या तीन महिन्यांपासून 29 कोटी रुपये खर्च करून कळंबोली येथील केंद्रीय कापूस निगमच्या (सीसीआय) गोदामात 635 खाटांच्या या जम्बो कोविड सेंटरचे काम पूर्ण केले आहे. जिल्ह्याच्या तुलनेत पनवेल तालुक्यात बाधितांची संख्या मोठी असल्याने पनवेल व उरण तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांसाठी सिडकोच्या माध्यमातून तातडीने किमान 1000 बेडचे सुसज्ज रुग्णालय उपलब्ध करून देण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 13 जुलै 2020 रोजी पत्र देऊन केली होती, तसेच रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनाही माहितीस्तव प्रत देण्यात आली होती.
या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंत्री महोदयांना केलेल्या मागणीत म्हटले होते की, पनवेल, उरण तसेच नवी मुंबईमधील शेतकर्‍यांच्या जमिनी सिडकोमार्फत निरनिराळ्या प्रकल्पासाठी अगदी तुटपुंज्या दरात संपादीत केलेल्या असून त्याबदल्यात सिडकोला प्रचंड फायदा झाला आहे. सद्यस्थितीत सिडकोचे पनवेल व उरण तालुक्यामध्ये मोठी गुंतवणूक असलेले विकास प्रकल्प सुरू आहेत. ज्या पनवेल व उरण तालुक्यातील शेतकर्‍यांच्या जमिनींवरील प्रकल्पांवर सिडको नावारूपाला आली.
पनवेल आणि उरण या दोन्ही तालुक्याच्या हद्दीतील कोरोना रुग्णांना आरोग्य सेवा पुरवणे सिडकोचे प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे मुलुंड येथे सिडकोने 1200 बेडचे कोविड रुग्णालय उभारले आहे. त्याच धर्तीवरती पनवेल व उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी किमान 1000 बेडचे जम्बो कोविड रुग्णालय तातडीने उभे करणे गरजेचे आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले होते.
या अनुषंगाने कळंबोली येथील बंद असलेल्या सीसीआय गोदामातील जागा सेंटरसाठी घेण्यात आली. गोदामातील एक लाख चौरस फुटाच्या जागेवर 635 खाटांचे हे केंद्र उभारण्यात आले असून यासाठी सिडकोला तीन महिन्यांचा अवधी लागला.
या केंद्रात 505 प्राणवायू खाटा, प्रौढांसाठी 100 अतिदक्षता खाटा, बालकांसाठी 25 अतिदक्षता खाटा आहेत, तर 20 आणि 13 मे. टन क्षमतेच्या दोन द्रव्य प्राणवायू साठवणूक टाक्या बसविण्यात आल्या आहेत. दोन दिवसांत सुरक्षा रक्षक येथे नेमले जाणार आहेत. सप्टेंबर महिन्यात हे केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने पालिकेने जेवण, औषधे, तसेच संबंधित साहित्यांचा पुरवठा करणार्‍या कंपन्यांसाठी निविदा जाहीर केली आहे. त्यामुळे पालिकेच्या संबंधित विभागांनी या रुग्णालयावर लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर राहिलेली कामे पूर्ण करून घ्यावीत, असे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत दिले आहेत. त्यानुसार सप्टेंबर महिन्यात हे जम्बो सेंटर सुरू होणार आहे.
शेकापच्या आयत्या पिठावर रांगोळ्या
आयत्या पिठावर रांगोळी काढण्याची खोड शेकापला लागली आहे. त्यामुळे शेकापच्या राज्य आणि पालिका स्तरावरील लोकप्रतिनिधींनी ‘आमच्यात प्रयत्नाने हे झाले’ अशी आवई उठवायला सुरुवात केली आहे.
‘राज्य सरकारने खर्चाची जबाबदारी उचलावी’
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीमुळे सुरू होत असलेले कळंबोली येथील जम्बो कोविड सेंटर चालविण्याची जबाबदारी पनवेल महापालिका घेत आहे, मात्र हे सेंटर चालविण्यासाठी येणार्‍या खर्चाची जबाबदारी राज्य सरकारने उचलावी, अशी मागणीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.

Check Also

केंद्रीय मंत्री रामदास आठवले रविवारी कामोठ्यात

महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ सभा कामोठे : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी …

Leave a Reply