Breaking News

कोकणातून शिवसेनेला हद्दपार करणार

ना. नारायण राणेंचा हल्लाबोल

रत्नागिरी : प्रतिनिधी
आगामी निवडणुकीत सगळे आमदार खासदार आपलेच हवेत. शिवसेना कुठे औषधालाही सापडता कामा नये, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. कोकणातून शिवसेनेला हद्दपार करायचे आहे, असे आवाहन ना. नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेत कार्यकर्त्यांना केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. वादग्रस्त विधानामुळे झालेली अटक आणि त्यानंतर जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी यात्रेचा पुनश्च शुभारंभ केला. यात्रेच्या तिसर्‍या टप्प्याला त्यांनी रत्नागिरीत सुरुवात केली आहे. त्या वेळेला मी तिथे असतो तर आवाज माझाच असता… असतो तर ना… जसे एका दरोडेखोराला अटक करतात, तसे केंद्रीय मंत्र्याला अटक करायला दोनशे अडीचशे पोलीस, वा काय पराक्रम आहे? महाराष्ट्रातील जनता अनेक समस्यांनी त्रस्त आहे. शेतकर्‍यांचा प्रश्न घ्या आजही त्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. पूरस्थिती घ्या, चिपळूण घ्या, महाड घ्या, अजून कुणालाही पैसे मिळालेले नाही, असे टीकास्त्र ना. राणे यांनी या वेळी सोडले.
नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्यांना द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. कसली भाषणे करता. मी मग सोडणार नाही. आता जुन्या गोष्टी काढणार, काढा ना. दोन वर्षे झाली अजूनही शोधताहेत. नाही मिळाले. आम्हालाही जुन्या गोष्टी माहिती आहेत. रमेश मोरेची हत्या कशी झाली? जया जाधवाची हत्या कशी झाली? त्याचे कारण काय आहे, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.
आपल्या बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर अ‍ॅसिड फेकायला कुणी सांगितले? काय संस्कार? आपल्याच भावाच्या पत्नीवर अ‍ॅसिड फेकले. ही प्रकरणे मी टप्प्याटप्प्याने काढणार. सुशांतची केस संपली नाही. दिशा सालियान प्रकरण अजूनही बाकी आहे. आम्ही भारतीय नागरिक आहोत. तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे. दादागिरी करू नका. तो तुमचा पिंड आहे. तुम्ही आम्हाला अनुभवले आहे. आमच्या वाटेला जाऊ नका. आता पूर्वीसारखा दोन दिवसांत आवाज खणखणीत झाल्यानंतर वाजवणार, असा इशारा त्यांनी दिला. आमच्या घरासमोर वरुण देसाई कोणीतरी येतो. आमच्या घरावर हल्ला
करतो. त्याला अटक नाही. एवढा पोलीस बंदोबस्त असून पोरांनी चोपलं. आता आला तर परत जाणार नाहीत. आमच्या घरावर कुणी येईल आम्ही नाही सोडणार, असा इशाराही त्यांनी दिला.
ना. राणेंचा शेतकर्‍यांना दिलासा
या वेळी ना. नारायण राणे यांनी रत्नागिरीत शेतकर्‍याशी संवाद साधताना आशीर्वाद द्यावेत यासाठी मी तुमच्याकडे आलो असून तुम्ही सर्वांनी जे स्वागत केलं त्याबद्दल मी तुमचा अतिशय ऋणी आहे, असे म्हटले आहे. बरेच आंबा बागायतदार मला भेटू इच्छित आहेत. त्यांचे काही प्रश्न आहेत. काही जणांनी व्यवसाय करणे कठीण झाले आहे याबद्दलची माहिती दिली. तुमचे निवेदन मला मिळाले आहे. या निवेदनाचा पुरेपूर अभ्यास करून बागायतदारांना कसा मोबदला मिळेल यासाठी नक्कीच प्रयत्न करेन. बागायतदारांना आत्महत्या करण्याची वेळ मी येऊ देणार नाही. देशाचा केंद्रीय मंत्री असलो तरी शेवटी मी कोकणातून गेलो आहे. माझ्या मंत्रिपदाचा कोकणाला उपयोग होईल याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन, असे ना. नारायण राणे यांनी म्हटले आहे.
‘गुन्हेगार होतो तर मुख्यमंत्री कसे केले’
राज्यात घरात घुसून बलात्कार होत आहेत, दरोडे पडत आहे. खून, मारामार्‍या होत आहेत, हे विसरू नका. सुशांतची हत्या झाली, दिशा सॅलियनची बलात्कार करून हत्या झाली, अजून आरोपी मिळाले नाहीत, असे अनेक जण आहेत. खरे आरोपी मिळत नाही आणि मिळणारही नाहीत. नारायण राणेच्या पाठी लागू नका, अन्यथा सगळंच बोलावं लागेल ते परवडणार नाही. मी एवढा गुन्हेगार होतो तर मुख्यमंत्री कसं काय केलं. मंत्रिपद कसं काय दिलं, असा प्रश्न नारायण राणे यांनी या वेळी उपस्थित केला. मी कोणताही गुन्हा केलेला नाही मात्र काहीजण सत्तेची मस्ती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Check Also

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे …

Leave a Reply