Breaking News

उरण नगर परिषद कर्मचार्यांनी केला निषेध

उरण : प्रतिनिधी

ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर कार्तव्याची अंमलबजावणी करीत असताना सोमवारी (दि. 30) झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ उरण नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांनी युनियनच्या वतीने एकदिवसीय कामबंद आंदोलन केले.

ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यासह त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे हे ठाणे शहरात अतिक्रमण विरोधी पथक घेऊन बेकायदेशीर हातगाड्यांवर कारवाई करत असताना गुन्हेगारी प्रवृत्तीचे हातगाडी फेरीवाले अमरजित यादव यांनी सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला.

या हल्ल्यात त्यांची तीन बोटे कापली गेली आहेत, तर सोमनाथ पालवे यांच्या हाताचे एक बोट कापले आहे. हा गुन्हेगारीचा फारच गंभीर प्रकार आहे. एका अधिकार्‍यावर जीवघेणा हल्ला करणे ही बाब निश्चितपणे चिंताजनक आहे.त्यामुळे उरण नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांनी एक दिवसाचे कामबंद आंदोलन करून या बाबीचा सर्वच स्तरातून जाहीर निषेध केला.

हा भ्याड हल्ला करणार्‍या इसमावर जलदगती न्यायालयासमोर सुनावणी होऊन या इसमास कडक शिक्षा व्हावी, अशा मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रायगड जिल्हाधिकार्‍यांमार्फत पाठवण्यात आले असून, त्या निवेदनाची प्रत उरण नगर परिषदेच्या अध्यक्षा व मुख्याधिकार्‍यांना देण्यात आली असल्याचे म्युनिसिपल एप्लॉईज युनियनचे अध्यक्ष रमेश कांबळे, कार्याध्यक्ष संतोष पवार व सचिव नरेंद्र उभारे यांनी सांगितले.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply