माणगाव : प्रतिनिधी
घरगुती भांडणावरून एका क्रूर माणसाने आपल्या दोन लहान मुलांसह पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. 7) माणगाव तालुक्यातील दहिवली गावात घडली. या तिहेरी हत्याकांडामुळे माणगाव तालुका हादरला आहे. हत्याकांडाचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही.
गोरेगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष देवजी शिंदे (वय 43) आणि त्याची पत्नी यांच्यात विविध कारणांनी घरगुती वाद होत असत. गुरुवारी सकाळी 7च्या सुमारास या दोघांमध्ये असेच भांडण झाले. हे भांडण मात्र कुटुंबातील तिघांच्या जीवावर बेतले. संतोषने पत्नी सुहानी (वय 30), मुलगा पवन (वय 5) या दोघांची दोरीने गळा आवळून, तर लहान मुलगा संचित (वय 2) याची थेट गळा घोटून हत्या केली. या घटनेनंतर संतोष घाबरून गेला. त्याने आपल्या हातून घडलेल्या या कृत्याची माहिती लगेचच गावच्या पोलीस पाटलांना दिली. त्यानंतर पोलीस पाटलांनी याबाबत गोरेगाव पोलीस ठाण्यात खबर दिली.
या घटनेची माहिती समजल्यावर गोरेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल टोपे, उपनिरीक्षक अक्षय सोनावणे, सहाय्यक फौजदार दिलीप जगताप व पथकाने दहिवली गावात भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर ते तिन्ही मृतदेह विच्छेदनासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात रवाना केली. आरोपी संतोष शिंदे याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस
निरीक्षक टोपेे करीत आहेत.
दरम्यान, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, माणगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकिरण काशीद यांनी घटनास्थळी व माणगाव उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली.