Breaking News

कल्पिता पिंपळेंवरील हल्ल्याचा निषेध

पनवेल महापालिका कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन; आयुक्तांना निवेदन

पनवेल : प्रतिनिधी

ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असताना फेरीवाल्याने तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीने आयुक्त गणेश देशमुख यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले.

ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या सोमवारी (दि. 30) अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असताना तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीचा फेरीवाला अमरजीत यादव याने श्रीमती पिंपळे व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये दोघांनाही गंभीर दुखापत झाली. या गंभीर कृत्याचा निषेध करण्यासाठी, तसेच या घटनेतील गुन्हेगारांवर तत्काळ खटला चालवून, गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आयुक्त, तसेच महाराष्ट्र राज्य मुख्याधिकारी संघटना मुंबईचे अध्यक्ष गणेश देशमुख यांना निवेदन दिले.

कर्तव्य बजावत असताना गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा अधिकार्‍यांवर हल्ले करतात, तेव्हा अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे, तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हल्ल्याविरोधात संघटित निषेध करण्यासाठी आज अधिकारी व कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन केले.

या वेळी उपायुक्त विठ्ठल डाके, सचिन पवार, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, मनपा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अनिल जाधव, शैलेश गायकवाड, सुनील मानकामे, तसेच मोठ्या संख्येने महिला कर्मचारीही उपस्थित होत्या.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply