मोहोपाडा : प्रतिनिधी
कोरोनाने जनजीवन विस्कळीत केले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.रसायनी परिसरातील वासांबे (मोहोपाडा) जिल्हा परिषद हद्दीत कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीचा आलेख सध्या खालावला असला तरी रसायनीकरांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे, असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. सध्या वासांबे (मोहोपाडा) जिल्हा परिषद विभागात 31 ऑगस्टपर्यंतच्या 10 दिवसांच्या कालावधीत एकूण 11 रुग्ण सक्रिय असून परिसरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1805 झाली आहे. यात कोरोनावर 1729 जणांनी मात केली आहे, तर वासांबे (मोहोपाडा) जिल्हा परिषद विभागातील एकूण 65 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. परिसरात मृत्यूदर जरी कमी असला, तरी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.