पनवेल : वार्ताहर
फिल्म इंडस्टीमध्ये अॅनिमेशन व्हीएफएक्सचे काम करत असल्याचे भासवून एका भामट्याने खारघरमधील थ्रीस्टार हॉटेलमधील दोन डिलक्स रुममध्ये आपल्या 12 वर्षीय मुलासोबत आठ महिने बस्तान मांडून हॉटेल व रेस्टॉरंटचे तब्बल 25 लाख 15 हजार रुपयांचे बिल थकवून मुलासह पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुरली मुरुगेश कामत (वय 43) असे या भामट्याचे नाव असून खारघर पोलिसांनी या त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
मूळचा अंधेरीचा रहिवासी असलेला मुरली कामत त्याच्या 12 वर्षांच्या मुलासह खारघरमधील थ्री स्टार हॉटेलमध्ये राहत होता. आठ महिन्यांपासून त्याचा हॉटेलमध्ये मुक्काम होता. 23 नोव्हेंबरला मुरली कामत मुलाला घेऊन हॉटेलमध्ये आला. आपण चित्रपटसृष्टीत काम करत असल्याचे सांगत त्याने दोन सुपर डिलक्स रुम बुक केले. यातली एक खोली मुक्कामासाठी, तर दुसरी व्यवसायिक बैठकांसाठी घेण्यात आली होती. एका महिन्यानंतर अनामत रक्कम भरू असे मुरली कामतने सांगितले होते. त्याने त्याचा पासपोर्ट हॉटेलकडे जमा केला होता.
17 जुलैला हॉटेल कर्मचार्यांनी कामत राहत असलेल्या खोलीचे दार उघडले. त्या वेळी कामत आणि त्याचा मुलगा बाथरूमच्या खिडकीतून पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे कर्मचार्यांना धक्काच बसला. कामतने त्याचा लॅपटॉप आणि मोबाइल हॉटेलमध्ये ठेवून पळ काढला. या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापनाने कामत विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.