नगरसेविका दर्शना भोईर यांचे आयुक्तांना निवेदन
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्र. 19 मधील रोजबाजार व मच्छीमार्केटमधील व्यावसायिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी पनवेल आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सध्या कोरोनाचे लसीकरण सुरू असून, महापालिका हद्दीतील विविध ठिकाणच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांना लस देण्यात येत आहे. प्रभाग क्र. 19 मधील रोजबाजार व मच्छीमार्केटमधील अनेक व्यावसायिकांनी एकही लस घेतलेली नसून व्यवसायाच्या निमित्ताने ते अनेक नागरिकांच्या संपर्कात येत असतात. त्यांच्या करिताही लसीची उपलब्धता होणे आवश्यक आहे. तरी पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र.19 मधील रोजबाजार व मच्छीमार्केटमधील व्यावसायिकांना लस उपलब्ध करून देण्यात यावी, असे नगरसेविका भोईर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.