Breaking News

धीर कसा धरायचा?

जो मराठवाडा अवघ्या महाराष्ट्रात तीव्र पाणीटंचाई सोसणारा, दुष्काळग्रस्त प्रदेश म्हणून ओळखला जातो, त्या मराठवाड्यातील नद्यांना आलेला पूर आज ओसरताना दिसत नाही. धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती बिकट झाल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. धीर सोडू नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना केले आहे. पण सरकारी मदतीचा आजवरचा अनुभव लक्षात घेता शेतकर्‍यांनी कुणाच्या आधाराने धीर धरायचा?

महाराष्ट्राच्या मागे लागलेली संकटांची मालिका थांबताना दिसत नाही. गुलाब चक्रीवादळाचे रूपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आणि परिणामस्वरुपी महाराष्ट्राच्या काही भागांत अतितीव्रवृष्टी होणार याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. परंतु हा अंदाज लक्षात घेऊन धरणांमधील पाणीसाठ्याचा विसर्ग नियोजनपूर्वक करण्याचे काम ठिकठिकाणच्या धरण प्रशासनांनी केले का, याची चौकशी होण्याची गरज आहे. धरणातील पाणी सोडा म्हणून आपण अनेक दिवस धरण प्रशासनाचे लक्ष वेधत होतो, परंतु त्यांनी आपली मागणी दुर्लक्षित केली. आणि आता ढगफुटीसारखा पाऊस झाल्यावर त्यांनी धरणाचे सारे दरवाजे उघडून दिले आहेत. त्यांच्या बेपर्वाईमुळे आपले अवघे शेत पाण्याखाली बुडून गेल्याचे सांगत आक्रोश करणार्‍या एका शेतकर्‍याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. मराठवाड्यावर ओढवलेली ताजी पूरस्थिती निसर्गनिर्मित किती आणि धरणांतील पाणीसाठ्याचे व्यवस्थापन योग्य तर्‍हेने न झाल्याने त्यात भर किती पडली याची चौकशी निश्चितपणे केली गेली पाहिजे व संबंधितांना झालेल्या नुकसानीसाठी जबाबदारही ठरवले गेले पाहिजे. मराठवाड्यात सोमवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू होता. मंगळवारी पावसाने रौद्ररूप धारण केले. संपूर्ण परिसरात आता शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे दिसते आहे. एकंदर 20 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. अर्थात ही आकडेवारी जाहीर करतानाच महाराष्ट्राला केंद्र सरकारने किमान 7 हजार कोटींची मदत द्यावी अशी मागणी करायला ते विसरले नाहीत. प्रत्येक पूरस्थितीपाठोपाठ जे होते ते सारे शिरस्त्याप्रमाणे आता मराठवाड्यातही होईल. तातडीने पंचनामे करून मदत देण्याची आश्वासने दिली जातील. प्रत्यक्षात पंचनामे यथावकाश होतील आणि नुकसानभरपाईच्या निकषांनी शेतकरी हवालदिल होईल. मराठवाड्यातील शेतकर्‍यांना आपत्तीतून बाहेर काढणार असे महाविकास आघाडीचे सरकार म्हणते आहे खरे, परंतु यापूर्वी अशाच संकटकाळात राज्यातील इतर भागांमध्ये जाहीर केलेल्या मदतीचे काय झाले हे मराठवाड्यातील जनता जाणते आहे. धीर सोडू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे खरे, परंतु शेतकर्‍यांनी धीर कुणाच्या आधारे धरायचा हेही त्यांनीच सांगावे. राज्यातील प्रशासन पंचनामे करील, केंद्रातील पथक येऊन परिस्थितीची पाहणी करून जाईल. राज्यातील सत्ताधारी नेहमीप्रमाणे केंद्राने मदत केली नाही म्हणून केंद्र सरकारकडे बोट दाखवतील. प्रत्येक आघाडीवर केंद्राकडेच मागणी करायची आणि केंद्राच्याच नावाने बोंब ठोकायची याच्या पलीकडे राज्यातील सत्ताधार्‍यांनी गेल्या दीड वर्षांत काय केले आहे? अतिवृष्टीमुळे आता शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या परिस्थितीविषयी नव्याने कुणाला काही सांगण्याची आवश्यकता नाही. राज्य सरकारने आपली जबाबदारी ओळखून शिताफीने मदतकार्य करावे एवढीच जनतेची अपेक्षा आहे. आघाडी सरकार आपले हे कर्तव्य पार पाडताना दिसले तरच मराठवाड्यातील शेतकरी धीर धरू शकेल.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply