Breaking News

उरण नगर परिषदेचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

रायगडात अतिवृष्टीचा इशारा

उरण : वार्ताहर

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार 12 ते 14 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. या कालावधीमध्ये  अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. उरण नगर परिषदेकडून नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, भाजप शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, मुख्याधिकारी संतोष माळी, नगरसेवक, नगरसेविका यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी.पुलावरून संरक्षक दगडावरून पाणी वाहत असल्यास प्रवास टाळावा. धाडसाने वाहन पाण्यामध्ये घालू नये. अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता राहील. सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. अनावश्यक ओव्हर टेक करून वाहनांच्या  तीन-तीन रांगा करू नये. ऐकेरी वाहतूक सुरू राहील, याची दक्षता घ्यावी. वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.

अतिवृष्टीमध्ये दरड कोसळण्याची शक्यता असल्याने प्रवास करताना काळजी घ्यावी. आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरांमध्ये पाणी शिरणार नाही, याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित राहावे. या कालावधीमध्ये आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेर पडू नये. घरामध्ये पाणी घुसून पाण्याची पातळी वाढत असल्यास तत्काळ घर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरूपाचे असेल तर तत्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षितस्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेऊन स्थलांतरित व्हावे.

घराच्या अवतीभोवती पाऊस व वादळामुळे कोणत्या वस्तू,  विजेचे खांब किंवा तारा, झाडे इत्यादी पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तू पासून लांब राहावे. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे. अतिवृष्टीचा फटका टाळण्यासाठी दरडप्रवण भागातील, समुद्र व खाडी किनारी तसेच नदी किनारी राहणार्‍या सखल भागातील लोकांनी सावधगिरी बाळगावी. दरड ग्रस्त गावांमधील नागरिकांनी वेळीच सुरक्षित ठिकाणी जाऊन आश्रय घ्यावा.

अतिवृष्टी होत असल्याने पाणी पातळी वाढत असेल तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा तथा पाऊस पडत असताना मासेमारी साठी व पोहायला समुद्रात जाऊ नये. धबधब्याच्या ठिकाणी जाऊ नये.

विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये मोबाईलचा वापर करू नये. ग्राम अकृती दलांनी सतर्क राहून वेळोवेळी तहसील कार्यालयास माहिती द्यावी. आपला जीव आपल्या मिळकती पेक्षा महत्त्वाचा असल्याने प्रथम जीवितास प्राधान्य द्यावे मदत आवश्यक असल्यास आपले ग्रामपंचायत तहसील कार्यालयात संपर्क साधावा तसेच जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष 02141 228473 व जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षाशी 02141 222097 या क्रमांक वर संपर्क साधावा.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply