कर्जत : बातमीदार
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कर्जत तालुक्यातील भालीवडी-वंजारवाडी या रस्त्याचे दोन वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. या रस्त्यावर आता प्रचंड खड्डे पडले आहेत. तर त्या भागातील पोटल रस्त्याची अवस्थादेखील दयनीय झाली असून स्थानिक ग्रामस्थांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. महापुराने कर्जत तालुक्यातील रस्त्यांची अवस्था बिकट करून ठेवली आहे. तालुक्यातील भालीवडी-वंजारवाडी रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 2018 मध्ये करण्यात आले होते, मात्र या रस्त्याचीही वाताहत झाली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन, वाहनचालक आणि प्रवासी त्रस्त आहेत. भालीवडी गावापासून पोटल गावाला जाणारा रस्तादेखील खड्ड्यांत हरवला आहे. त्यामुळे टाटा कॅम्प भागातील वाहनचालकांचे कंबरडे मोडण्याचे काम सुरू आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत. वंजारवाडी-भालीवडी आणि पोटल रस्त्यांची जिल्हा परिषद बांधकाम विभागाने लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी या भागातील ज्येष्ठ कार्यकर्ते माजी सरपंच शिवाजी बार्शी यांनी केली आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या मालकीच्या रस्त्यावर अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्याची पाहणी केली जात असून, या खड्ड्यांची दुरुस्ती करण्याबाबत वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहिली जात आहे.
-प्रल्हाद गोपणे, उपअभियंता, रायगड जि. प. बांधकाम विभाग