मुंबई : प्रतिनिधी
राज्यात काँग्रेसमध्ये लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता असून, बाळासाहेब थोरात यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष नेमण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये नाना पटोले यांचे नाव आघाडीवर आहे, मात्र प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वीच त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे.
काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. सरकार भक्कम असून पुढील निवडणुकांमध्येही तिन्ही पक्ष एकत्र असतील असे या पक्षांच्या नेत्यांकडून वारंवार सांगितले जात आहे, मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीच्या चर्चेत आघाडीवर नाव असलेल्या नाना पटोले यांनी राज्यात आपला पक्ष स्वबळावर सत्तेत कसा येईल असे सांगत सूचक विधान केले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, आमच्या पक्षात जे काही संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार आहेत ते राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आहेत. जी जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडून पक्ष बळकट करण्यासाठी आणि स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. पटोले यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे.
राहुल गांधींसमोर दोन गटांत खडाजंगी
नवी दिल्ली : काँग्रसेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत राहुल गांधींसमोर झालेल्या पक्षाच्या बैठकीत दोन गटांमध्ये खडाजंगी झाली. निवडणुकांमधील पराभवानंतर पक्षनेतृत्व आणि व्यवस्थापनासंबंधी वरिष्ठ नेत्यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते,
ज्यावरून गदारोळ निर्माण झाला. अखेर दुसर्या गटाने माघार घेतली. काँग्रसेच्या अध्यक्षपदाबाबत पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर जून महिन्यात निर्णय घेण्याचे ठरले आहे.