मुंबई ः प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा अखेर सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार आता राज्यभरातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभागाने मुख्यमंत्री कार्यालायला प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे यंदाही ऑनलाइन पद्धतीनेच शैक्षणिक वर्ष सुरू करावे लागले, मात्र ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण काहीसे कमी होत असल्याने सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, मात्र शाळा कुठल्या वर्गांची, कशा पद्धतीने व कोणत्या वेळेत सुरू होतील याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) घेतलेल्या सर्वेक्षणात 81.18 टक्के पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असल्याचा निष्कर्ष दिसून आला. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव कमी असलेल्या भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास 7 जुलैला मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यानंतर पाचवी ते सातवीचे वर्ग 17 ऑगस्टपासून सुरू करण्यास सुरू करण्यासही शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे मान्यता दिली होती, पण कोरोनाची दुसरी लाट आली आणि शाळा पुन्हा बंद झाल्या.
दरम्यान, शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या असून महापालिका क्षेत्रासाठी आयुक्तांच्या, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत स्तरासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याच्या, शिक्षकांचे लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …