Breaking News

पनवेल महापालिकेचा झंझावात

305 कोटींच्या विकासकामांना महासभेत मंजुरी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
नागरिकांना अभिप्रेत असलेला पनवेल महानगरपालिका हद्दीतील विकास अल्पावधीतच वेगवान झालेला आहे. शहरासह ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हा उद्दिष्ट ठेवून लोकप्रतिनिधी व प्रशासन काम करीत आहे. त्यामुळे विकासाचा महामेरू कायम राहून पनवेल महापालिका येत्या काळात राज्यातील उत्कृष्ट महापालिका ठरेल, अशी खात्री महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी शुक्रवारी (दि. 24) येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस उपमहापौर जगदिश गायकवाड, ज्येष्ठ नगरसेवक अनिल भगत, नगरसेवक व प्रवक्ते प्रकाश बिनेदार, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती सुशिला घरत, हेमलता म्हात्रे, अनिता पाटील उपस्थित होते.
महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, पनवेल महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सातत्याने केले जात आहे. त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा विकासकामांचा झंझावात आज झालेल्या महापालिकेच्या महासभेत 305 कोटी रुपयांच्या विकासकामांना दिलेल्या मंजुरीवरून दिसून येत आहे. पनवेलचे मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असताना नागरिकांचा विकासही तशा पद्धतीने झाला पाहिजे या दुरदृष्टीतून नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतरित करण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून घेतले आणि मोठ्या प्रमाणात विकासाला चालना मिळाली. पनवेल महापालिका हद्दीत अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होत असताना ग्रामीण भागातही स्मार्ट व्हिलेज योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे शहरांसोबत गावांचाही विकास साधला जात असून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यातून आणि मार्गदर्शनातून विकासाचा आलेख उंचावत आहे.
महापौर डॉ. चौतमोल यांनी पुढे सांगितले की, आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी झालेल्या महासभेत महापालिका हद्दीतील खारघर, कळंबोली व नवीन पनवेल या ठिकाणी सहा प्ले ग्राऊंड, 15 उद्याने विकसित करण्यासाठी 27 कोटी 25 लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली. हे सर्व विकसित करीत असताना या ठिकाणी सोयीसुविधांयुक्त प्ले ग्राऊंड व उद्याने मिळणार आहेत. त्यामध्ये युवकांना खेळण्यासाठी बॅडमिंटन, लॉन टेनिस, क्रिकेट, बास्केटबॉल, हॉलीबॉल, स्केटिंग, लहान मुलांसाठी किड्स प्ले (खेळांचे साहित्य) तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरूंगळा केंद्र, वॉकिंग ट्रॅक, तसेच ओपन जिमचा समावेश असणार आहे.  
पनवेल महापालिकेच्या सुलभ कामकाजाच्या दृष्टीने व नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी अशा अद्ययावत मुख्यालयाची आवश्यकता आहे त्याकरिता नवीन पनवेल (पश्चिम) येथील भूखंड क्रमांक 4 सेक्टर 16, क्षेत्रफळ 20086 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड सिडकोकडून प्राप्त झाला आहे या भूखंडाकरिता महापालिकेने 25 कोटी 54 लाख 72 हजार 701 रुपये सिडकोला अदा केले असून भूखंड पनवेल महापालिकेच्या ताब्यात घेण्यात आला आहे तसेच याकरिता वास्तू विशारद सल्लागार म्हणून मी. हितेन सेठी यांची जाहीर स्पर्धात्मक निविदा मागवून सर्वांत उत्कृष्ट व न्यूनतम दरास 9 सप्टेंबर 2020 रोजी स्थायी समितीच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात आली आहे.
पनवेल महापालिकेची प्रस्तावित इमारत ही तळघर, तळमजला, सहा मजले व सहावा वरचा मजला तसेच टेरेसवर आर्ट गॅलरी अशी एकूण 25415.76 एवढे क्षेत्र आहे. या भव्य अशा इमारतीस ढोबळ खर्च 280 कोटी रुपये अपेक्षित आहे. या कामाच्या अंदाज पत्रकाच्या दृष्टीने व आर्थिक उपलब्धतेनुसार काम करण्याच्या दृष्टीने दोन टप्प्यांमध्ये निविदा मागविण्यात येणार आहे. त्यानुसार प्रथम टप्प्यांमध्ये इमारतीच्या बांधकामाचा अंदाजित खर्च रक्कम 137 कोटी रुपये आहे. दुसर्‍या टप्प्यात इंटीरियर वर्क, फर्निचर, लॅण्ड  स्केपिंग, महासभागृहातील ऑडिओ व्हिज्युअल सिस्टीम व इतर सुविधा या बाबींचा अंदाजित खर्च 143 कोटी रुपये खर्च येणार आहे. महासभेने प्रशासकीय व आर्थिक मान्यता दिली असून लवकरच पहिल्या टप्प्यातील निविदा प्रसिद्ध होणार असल्याचेही त्यांनी नमूद करीत या प्रशासकीय इमारतीची उभारणी झाल्यानंतर राज्यातील एक आदर्श वास्तू म्हणून तिचा नावलौकिक होईल, असा विश्वासही महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी व्यक्त केला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply