Breaking News

शाळेची घंटा वाजणार

गेले 18 महिने बंद असलेल्या शाळांची घंटा 4 ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा घणघणू लागणार आहे. सुनसान पडलेली शाळांची आवारे पुन्हा एकदा बाळगोपाळांच्या किलबिलाटाने गजबजून जाणार आहेत. जवळपास दीड वर्षाहून अधिक काळ घरामध्ये बसून ऑनलाइन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थीवर्गाला पुन्हा एकदा गणवेश चढवून शाळेतील प्रत्यक्ष शिक्षणाची मौज अनुभवता येणार आहे. पुरेसा गोंधळ घालून झाल्यानंतर आणि शिक्षणक्षेत्राचा पुरता खेळखंडोबा केल्यानंतर आता कुठे राज्यातील सरकारला विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी वाटू लागली हे विशेष आहे.

शाळा नेमक्या कधी सुरू करायच्या या एका प्रश्नाबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गेले काही महिने यथेच्छ घोळ घातला आहे. असे असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीच्या आधीच शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्याने लाखो पालक बुचकळ्यात पडले असल्याची शक्यता आहे. कारण कुठलाही निर्णय घेताना ताक फुंकून पिणार्‍या मुख्यमंत्र्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला हे एका अर्थी धाडसच म्हणायला हवे. एका सर्वेक्षणात मध्यंतरी दिसून आले होते की 67 टक्के पालकांना आता शाळा लवकरात लवकर सुरू व्हाव्यात असे वाटते. ऑनलाइन शिक्षणाचा अजूनही तितकासा प्रभाव जाणवत नाही हे शिक्षण खात्याला उशिरा का होईना कळून चुकले ही स्वागतार्ह बाबच म्हटली पाहिजे. ऑनलाइन शिक्षणाला निदान आपल्या देशात तरी अजूनही अनेक मर्यादा आहेत. ऑनलाइन शिक्षणासाठी इंटरनेटची व्यवस्था सर्वदूर पसरलेली आणि सशक्त असावी लागते तसेच त्यासाठी लागणारी मोबाइल, लॅपटॉप, किंवा मोडेम यांसारखी तांत्रिक साधने मुबलक प्रमाणात उपलब्ध असावी लागतात. प्रगत देशांमध्ये या सुविधा सहज उपलब्ध होऊ शकतात, परंतु आपला देश आता कुठे विकासाच्या भरार्‍या मारण्याची स्वप्ने पाहू लागला आहे. इतकी वर्षे अशी स्वप्ने पाहणेदेखील आपल्याला परवडण्यासारखे नव्हते. याशिवाय शाळेतील बाकांवर मिळणार्‍या प्रत्यक्ष शिक्षणाची ऑनलाइन पद्धतीशी तुलनाच होऊ शकत नाही. शाळेमध्ये फक्त विद्यार्जन नव्हे; तर विद्यार्थीवर्गास सामाजिक भानदेखील मिळवता येते. त्यामुळे आणखी सुमारे दोन आठवड्यांनंतर शाळा सुरू होणार या बातमीचे सर्वच जण स्वागत करतील. ग्रामीण भागामध्ये पाचवी ते बारावी आणि शहरी भागामध्ये आठवी ते बारावी असे वर्ग 4 ऑक्टोबरपासून सुरू होतील. अर्थात, कोरोना प्रतिबंधक नियमांची काटेकोर अंमलबजावणी केल्यानंतरच या शाळा सुरू होऊ शकणार आहेत. त्यासाठी सरकारनेच विशेष कोरोना नियमावली जाहीर केली असून शाळेमध्ये एक विद्यार्थी जरी कोरोनाने बाधित झालेला आढळला तरी शाळा ताबडतोब बंद करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल. विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या आवारात गर्दी करू नये. पटसंख्या जास्त असल्यास दोन सत्रांमध्ये शाळा सुरू ठेवावी अशा प्रकारचे नियम घालून देण्यात आले आहेत. महाविद्यालये मात्र इतक्यात सुरू होणार नाहीत असे दिसते. ती टप्प्याटप्प्यानेच सुरू करावीत असा सरकारचा विचार आहे. शाळांच्या संदर्भात सरकारी नियमावली काही पालकांना जिकिरीची वाटू शकेल, परंतु सुरुवातीला तरी एवढी काळजी घेणे आवश्यकच आहे. शाळांच्या चालकांना पूर्वतयारीसाठी थोडा अधिक वेळ द्यायला हवा होता हे मात्र खरे. कारण अवघ्या दहा दिवसांमध्ये शाळा सुरू करण्याची तयारी करणे अनेक शिक्षण संस्थांना कठीण जाणार आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply