वाढीव वीज बिलाविरोधात धडकले मोर्चे
मुंबई : प्रतिनिधी
कोरोना काळातील वीज बिलवाढीविरोधात राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणार्या भाजपच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यभरात गुरुवारी (दि. 26) जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात आले. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये मनसेचे कार्यकर्ते वीज बिलमाफीची मागणी करीत रस्त्यावर उतरले. यासंबंधी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेने बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता. या वेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्यात मनसेकडून शनिवार वाडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. मनसे शहर अध्यक्ष अजय शिंदेसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस कार्यकर्त्यांना फरासखाना पोलीस ठाण्यात घेऊन गेले. या वेळी जोवर जिल्हाधिकारी इथे येऊन आमच निवेदन स्वीकारणार नाही तोवर आमच ठिय्या आंदोलन सुरूच राहिल, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. अखेर वीज बिलांसंदर्भातील निवेदन पोलिसांकडे देत पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थगित करीत केले.
ठाण्यातही मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभाग नोंदवला. या वेळी मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, अभिजीत पानसे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नाशिकमध्ये राजगड कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा मनसेने काढला. औरंगाबादमध्ये पोलिसांनी काही कार्यकर्त्यांची धरपकड केल्यानंतर मोर्चा पांगला, पण नंतर पुन्हा मोर्चा सुरू झाला. त्यानंतरही पोलिसांनी धरपकड केली, मात्र मनसेचे कार्यकर्ते मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचे दिसून आले.
राज्य सरकारकडून जनतेची लूट : राज ठाकरे
या आंदोलनात मनसे प्रमुख राज ठाकरे सहभागी झाले नाही, परंतु त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘या सरकारने वीज देयकातून जिझिया कर लावला आणि जनतेची लूट सुरू केली. हे सरकार जनतेलाच वाढीव वीज आकारणीचा शॉक देणार असेल तर मग आम्हाला जनतेच्या वतीने सरकारला शॉक द्यावा लागेल. आम्ही महाराष्ट्रातील जनतेला काही झाले तरी वाढीव वीज देयके भरू नका, असे आवाहन केले आहे. असा असहकार पुकारल्याशिवाय सरकारला जनतेतील असंतोष जाणवणार नाही. सरकार तुमच्या विजेची जोडणी तोडू शकत नाही. त्यांनी तसा प्रयत्न केला तर संघर्ष माझ्या महाराष्ट्र सैनिकांशी आहे हे लक्षात ठेवा’, असा इशारा राज यांनी दिला आहे.