Breaking News

दहशतवादाला थारा नाही!

अवघे विश्व गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीशी झुंजत आहे. कोविड-19 विषाणूने प्रचंड उलथापालथ केली. कोरोनारूपी आपत्ती अचानक आलेली आहे, पण दहशतवादाची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून जगाला भेडसावत आहे. तिचा मुकाबला करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येणे काळाची गरज आहे.

अफगाणिस्तावर तालिबानी दहशतवाद्यांनी ताबा मिळविलेला असून तेथे आता तालिबानी राजवट आहे. तालिबानी हे क्रूरतेसाठी ओळखले जातात. त्यांनी आपले हातपाय इतरत्र पसरू नये यासाठी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पाकिस्तानी दहशतवादाला वेळोवेळी ठेचणे जरूरीचे आहे. कारण हेच दोन-तीन देश दहशतवाद्यांना पोसत असून त्याचा त्रास संपूर्ण देशाला भोगावा लागत आहे, ज्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बोलताना खरपूस समाचार घेतला. काही देश त्यांनाही दहशतवादाचा मोठा धोका आहे हे माहीत असूनही दहशतवादाचा वापर राजकीय साधन म्हणून करीत आहेत, असा अंगुलीनिर्देश करीत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर नाव न घेता टीका केली. पाकिस्तानची भूमी ही दहशतवाद्यांसाठी पोषक मानली जाते. अनेक कुप्रवृत्ती तेथे आश्रयाला असल्याची अनेक उदाहरणे आहेत. अमेरिकेवर हल्ला करणारा ओसाबा बिन लादेन, भारतात बॉम्बस्फोट घडविणारा डॉन दाऊद इब्राहिम यांना पाकिस्तानने आपल्याकडे आश्रय दिला. हे दहशतवादाला खतपाणी घालण्यासारखेच नव्हे तर काय? भारताचे सक्षम नेतृत्व असलेल्या पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत याचा उल्लेख केला नसता तरच नवल. अफगाणिस्तानातील परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले. अफगाणिस्तानमधील महिला आणि अल्पसंख्याकांना मदतीची आवश्यकता आहे. त्यांना मदत करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. तेथील परिस्थितीचा वापर कोणताही देश आपल्या राजकीय स्वार्थासाठी करणार नाही, याबद्दलही आपल्याला सतर्क राहावे लागेल, असे पंतप्रधान मोदींनी यांनी स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हिंदीत केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी लोकशाही मूल्ये, कोरोनानंतरची जागतिक अर्थव्यवस्था, भारताची प्रगती अशा अनेक गोष्टींवरही प्रकाश टाकला. पंतप्रधान मोदींबरोबरच भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांनीही दहशतवादाबाबत पाकिस्तानचे कान टोचले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी उपस्थित केलेल्या काश्मीरच्या मुद्द्यावर बोलताना दुबे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान प्रत्यक्षात शांततेचा पुरस्कर्ता असल्याचा आव आणत असला तरी तो आग लावणारा देश आहे, पाकिस्तानात दहशतवाद्यांना खुलेआम आश्रय मिळतो, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानचा ढोंगी बुरखा फाडला. भारताने काश्मीरला विशेष दर्जा देणारा संविधानातील कलम 370 रद्द केल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान यांनी टीका करताना पाकिस्तानवादी नेते सय्यद अली शहा गिलानी यांच्या मृत्यूचा उल्लेख केला होता. त्याला उत्तर देताना दुबे यांनी, जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग असून त्यात पाकिस्तानने बेकायदा कब्जा केलेल्या काही भागांचाही समावेश आहे. पाकिस्तानने त्या भागांवरचा ताबा सोडावा, असे सुनावले. एकूणच संयुक्त राष्ट्रसंघाची परिषद दहशतवादाच्या विषयाने गाजली. त्यात भारताने सूचविलेल्या मुद्द्यांवर लक्ष्य केंद्रित केल्यास संपूर्ण विश्वात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply