जागा बिल्डरच्या घशात टाकण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही -अॅड. महेश मोहिते
मुरूड : प्रतिनिधी
क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या जागेचे आरक्षण मुरूड नगर परिषदेतील सत्ताधारी पक्षाने गुपचूप बदलले असून, सदर जागा बिल्डरच्या घशात टाकण्याचा डाव कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी येथे दिला.
मुरूड शहरातील सुभाषचन्द्र बोस पाखाडी (शेगवाडा) येथील एक भूखंड क्रीडांगणासाठी राखीव ठेवण्यात आला होता. मात्र नगर परिषदेतील सत्ताधारी पक्षाने या जागेचे आरक्षण बदलून सदर जागा निवासी क्षेत्र करण्याचा ठराव मंजूर केला असल्याच माहिती अधिकारात स्पष्ट झाले आहे. त्या संदर्भात मुरूडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत अॅड. मोहिते बोलत होते. क्रीडांगणासाठी असलेल्या जागेचे आरक्षण तसेच कायम राहावे, यासाठी भाजप मोठे जनआंदोलन करेल, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
क्रीडांगण विकसित न करता जागेचे निवासी क्षेत्र करणे म्हणजे बिल्डर लॉबीला आमंत्रित करण्यासारखे आहे. मोठ्या रकमेची देवाण घेवाण करण्यासाठी सदर जागेचे आरक्षण बदलले असावे, अशी शंका अॅड. मोहिते यांनी उपास्थित केली.
सदर जागेचे आरक्षण बदलले असल्याची माहिती सहाय्य्क रचना विभागाकडून प्राप्त झाली आहे. विद्यमान नगराध्यक्षांनी हा ठराव मंजूर केला आहे. आरक्षण बदलून जागा बिल्डरच्या घशात टाकण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. पैसे कमावण्यासाठी अश्या क्लुप्त्या आम्हाला मान्य नाहीत, असे अॅड. मोहिते म्हणाले.
शेगवाडा येथील मोरी चुकीच्या पद्धतीने बांधल्यामुळे येथील लोकांच्या घरात पाणी शिरून जीवनावश्यक वास्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या मोरीचे काम स्लॅब ड्रेनेज प्रमाणे करणे बंधनकारक असताना जाणीवपूर्वक तीन पाईप टाकून करण्यात आले आहे. त्यासाठी नगर परिषदेने सहा लाख 65 हजार रुपये खर्च केले. या कामातसुद्धा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप अॅड. महेश मोहिते यांनी या वेळी केला.
जिल्हाधिकार्यांनी सदर मोरी तोडण्याचे आदेश दिले होते, परंतु नगर परिषदेने मोरी तोडली नाही. याबाबत भाजपच्या शिष्टमंडळाने नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांची भेट घेतली. त्यावेळी 30 सप्टेंबर रोजी नगर परिषदेची जनरल सभा असून त्यामध्ये मोरी तोडण्याबाबतचा ठराव घेण्यात येणार असल्याचे मुख्याधिकार्यांनी सांगितले आहे. मात्र नगर परिषदेने हे बांधकाम तोडले नाही तर येथील रहिवाशी हे बांधकाम तोडणार असल्याचे अॅड. मोहिते यांनी स्पष्ट केले.
भाजप मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, ज्येष्ठ नेते आण्णा कंधारे, शहर अध्यक्ष उमेश माळी, महेश मानकर, अभिजित पानवलकर, सुधीर पाटील, बाळा भगत आदी या वेळी उपस्थित होते.