नवी मुंबई ः बातमीदार
नवी मुंबई महापालिका परिसरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे बरे होणार्यांचे प्रमाणदेखील अधिक आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 50 टक्के असताना नवी मुंबईचा रिकव्हरी रेट 57 ते 58 टक्के आहे. त्यात सध्या देशात बरे होणार्या कोरोना रुग्णांचा वापर करीत प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यात आली असून ती बाधितांसाठी परिणामकारक ठरू लागली आहे. त्यामुळे आद्यप जरी कोरोनावर लस निघाली नसली तरी या थेरपीने आशा पल्लवित झाल्या आहेत. नवी मुंबई पालिकाही यासाठी प्रयत्नशील असून नवी मुंबईतील खासगी रुग्णालयांनी याबाबत शासन दरबारी परवानगी मागितली आहे.
जगभरातील डॉक्टर्स, औषध कंपन्या विविध प्रकारच्या चाचण्या करीत असून कोरोनावर लवकरच लससुध्दा उपलब्ध होण्याची आशा आहे, मात्र दुसर्या बाजूस प्लाझ्मा थेरपीने आशेचा किरण दाखविला आहे. सध्या देशात कोरोनाबधितांची संख्या वाढत असली तरी बरे होणार्यांचे
प्रमाणदेखील जगाच्या तुलनेत जास्त आहे. कोरोनावर यशस्वी मात केलेल्या रुग्णांचे रक्त घेऊन त्यातील प्लाझ्मा जर एखाद्या कोरोना रुग्णाला दिला, तर हा आजार बरा होण्यास मदत होते हे काही हॉस्पिटल्समध्ये सिद्ध झाले आहे. त्यामुळे सरकारने प्लाझ्मा थेरपीचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्याचे ठरविले आहे. नवी मुंबई पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला अनुसरून अनेकांनी रक्तदान केले आहे. प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान महत्त्वाचे आहे. नवी मुंबईचा रिकव्हरी रेटही दिलासादायक आहे. कोरोनातून बरे झालेल्यांनी प्लाझ्मा थेरपीसाठी पुढे येण्याची गरज भासू लागली आहे. नवी मुंबईतील रिलायन्ससारख्या रुग्णालयांनी शासनाकडे प्लाझ्मा थेरपीसाठी परवानगीदेखील मागितली आहे.
कोरोनावर कोणताही रामबाण उपाय न सापडल्यामुळे प्लाझ्मा थेरपी काही प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणार्यांनी प्लाझ्मा थेरपीसाठी पुढे यावे. पालिकेनेही याबाबत नागरिकांत जनजागृती करणे गरजेचे आहे. समाजमाध्यमांचा वापर करीत जनजागृतीची आवश्यकता आहे. रुग्णांना आपल्या शरीरातील रक्त देण्यास प्रवृत्त करणे व त्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. पालिकेने शासनाची परवानगी घेत स्वतंत्र प्लाझ्मा सेंटर पालिकेतील रक्तपेढीत सुरू करावे.
-डॉ. प्रतीक तांबे, अध्यक्ष, इम्फाम, नवी मुंबई
नवी मुंबई महापालिका प्लाझ्मा थेरपी राबविण्याच्या विचारात आहे. त्यासाठी शासनाकडून विशेष परवानगी लागते. नवी मुंबईतील रिलायन्ससारख्या खासगी रुग्णालयांनी शासनाकडे याबाबतची परवानगी मागितली आहे. पालिका खासगी रुग्णालयांना याबाबत प्रोत्साहन देईन. प्लाझ्मा थेरपीमुळे एक नवा पर्याय नवी मुंबईतील रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. -अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका