राजस्थानवर मात
दिल्ली : वृत्तसंस्था
सलामीवीर शिखर धवनची धडाकेबाज अर्धशतकी खेळी आणि ऋषभ पंतची तुफानी फटकेबाजी या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सहा गडी राखून विजय मिळवला. पंतच्या स्फोटक खेळीने अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीवर अक्षरशः पाणी फेरले. या विजयासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे.
ऋषभ पंतची (78) दणकेबाज नाबाद खेळी आणि शिखर धवनचे (54) अर्धशतक यांच्या बळावर दिल्लीने राजस्थानला सहा गडी राखून पराभूत केले. सलामीवीर अजिंक्य रहाणेच्या नाबाद 105 धावा आणि कर्णधार स्मिथचे दमदार अर्धशतक याच्या जोरावर राजस्थानने 20 षटकांत 6 बाद 191 धावा ठोकल्या होत्या, पण पंतच्या फटकेबाजीने दिल्लीला चार चेंडू राखून विजय मिळवून दिला.
192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने चांगली सुरुवात करीत सहाव्या षटकात अर्धशतकी सलामी दिली. चांगल्या लयीत असलेल्या शिखर धवनने दमदार अर्धशतक ठोकले, पण त्यानंतर लगेचच तो माघारी परतला. त्याने 27 चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यर स्वस्तात बाद झाला. त्याने केवळ 4 धावा केल्या. धवन बाद झाल्यानंतर ऋषभ पंतने जबाबदारीने खेळ करीत पहिल्यांदा 26 चेंडूंत अर्धशतक ठोकले. अत्यंत संयमी खेळी करणारा पृथ्वी शॉ झेलबाद झाला आणि दिल्लीला तिसरा धक्का बसला. शॉने 39 चेंडूंत 42 धावा केल्या. त्यानंतर पंतने सारी सूत्रे हाती घेऊन नाबाद 78 धावांची खेळी करीत दिल्लीला विजय मिळवून दिला.
त्याआधी दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली आणि राजस्थानला प्रथम फलंदाजीस आमंत्रण दिले. सलामीवीर अजिंक्य रहाणे याने धावेसाठी नकार दिला असतानाही त्याचा सहकारी संजू सॅमसन पुढे आला आणि रबाडाने त्याला धावबाद केले. सॅमसनला एकही चेंडू न खेळता माघारी परतावे लागले. संजू सॅमसन सुरुवातीलाच माघारी परतल्यानंतर कर्णधार स्टिव्ह स्मिथच्या साथीने रहाणेने डाव सावरला. या दोघांनी केलेल्या फटकेबाजीच्या बळावर राजस्थानने सहाव्या षटकात पन्नाशी गाठली. अतिशय संयमी फलंदाजीसाठी ओळखल्या जाणार्या रहाणेने या सामन्यात मात्र तडाखेबाज सुरुवात केली. पॉवर-प्लेमधील फटकेबाजीच्या जोरावर त्याने केवळ 32 चेंडूंत आपले अर्धशतक साजरे केले. राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने 31 चेंडूंत दमदार अर्धशतक ठोकले, पण पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला. रहाणे-स्मिथ जोडीने शतकी (130) भागीदारी केली. पाठोपाठ अष्टपैलू बेन स्टोक्स स्वस्तात झेलबाद झाला, पण सलामीवीर रहाणेने एक बाजू लावून धरत तुफान फटकेबाजी केली. त्याने 58 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. राहणे शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने 63 चेंडूंत 105 धावा केल्या. यात 11 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.