Breaking News

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सकस विचारांची पेरणी आवश्यक -वेच्या गावित

कर्जत : बातमीदार

आदिवासी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी सकस विचारांची पेरणी करण्याची गरज असल्याचे मत राज्य शिक्षण विभागाचे मार्गदर्शक शिक्षक वेच्या गावित यांनी कर्जत तालुक्यातील पिंगळस येथील आश्रमशाळेत व्यक्त केले. आदिवासी विद्यार्थ्यांनी भविष्यात चांगले ध्येय गाठावे यासाठी राज्य प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि रायगड जिल्ह्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळा यांच्या माध्यमातून अकरावीच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंगळस आश्रमशाळेत मार्गदर्शक शिक्षक वेच्या गावित यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. त्यांनी या वेळी विद्यार्थ्यांशी हितगूज करताना वैयक्तिक स्वच्छता, नीटनेटकेपणा, निरोगी निरामय आरोग्य, राहणीमान, अभ्यास- वाचन आणि लेखन याबरोबर ’स्व’ अभिव्यक्तीचा विकास कसा करावा, वेळेचे नियोजन कसे करावे, अभ्यास कसा करावा, यावर मार्गदर्शन केले. आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मागाडे यांनी सुसंवाद सभेचे प्रास्ताविक केले. मार्गदर्शक शिक्षक वेच्या गावित यांनी तब्बल दोन तास विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत, तर कधी आदिवासी बोलीभाषेत त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी त्यांनी शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली. आदिवासी समाजातील अनिष्ठ रूढी-परंपरा, अंधश्रद्धा याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसे पाहावे, योग्य चालीरिती कशा आहेत याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना करावे, असे आवाहन गावित यांनी या वेळी केले. या वेळी सुमारे 400 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply