Breaking News

‘आरटीपीसीआर’ चाचण्यांची क्षमता वाढवणार

सध्या दिवसाला दोन हजार चाचण्या करण्याची क्षमता

नवी मुंबई : प्रतिनिधी

तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी नेरूळ येथील मीनाताई ठाकरे सार्वजनिक रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या प्रयोगशाळेची दैनंदिन चाचणी क्षमता वाढविण्यात येणार आहे. सध्या या प्रयोगशाळेत दिवसाला दोन हजार चाचण्या करण्याची क्षमता आहे, पण ही क्षमता येत्या काळात थेट पाच हजार चाचण्या अशी होणार आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेत राज्य शासनाने निश्चित केलेल्या प्रयोगशाळेतून करोना चाचणी केली जात होती. नाक व घशातील लाळेचे नमुने घेऊन करण्यात येणार्‍या आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल येण्यास विलंब लागत होता. रुग्ण जास्त आणि प्रयोगशाळा कमी असल्याने या चाचणी अहवालांचा अनेक ठिकाणी गोंधळ उडत असल्याचे चित्र होते. एका खाजगी प्रयोगशाळेने एकाच रुग्णाचे 24 तासांत वेगवेगळे अहवाल देऊन या गोंधळात भर घातली होती. नवी मुंबईतील करोना रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत असल्याने आयुक्त अभिजीत बांगर यांनी महापालिकेची प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला. नेरूळ येथील सार्वजनिक रुग्णालयाची इमारत नव्याने बांधण्यात आली असून हे रुग्णालय सुरू करण्याच्या प्रतीक्षेत होते. त्या रुग्णालयाच्या दुसर्‍या मजल्यावर ही प्रयोगशाळा कमी कालावधीत उभारण्यात आली. दिवसाला एक हजार करोना चाचणी करणारी ही प्रयोगशाळा केवळ 11 महिन्यांत सुरू करण्यात आली. त्यानंतर गेले वर्षभर या प्रयोगशाळेत शहरातील सर्व करोना रुग्णांची चाचणी केली जात असून आता ही क्षमता दोन हजार चाचण्यांची आहे. त्यामुळे आतापर्यंत पाच लाख 75 हजार 13 चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. करोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन पालिकेने जय्यत तयारी केली आहे. यात या प्रयोगशाळेतील चाचणी क्षमता दिवसाला पाच हजार चाचण्यांची करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ करोना काळासाठीच नाही, तर त्यानंतरही या प्रयोगशाळेत असाध्य आजारांवर निदान केले जाणार आहे.

अव्याहत सुरू

गेल्या वर्षी 4 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आलेल्या या प्रयोगशाळेत वर्षभरात 4 लाख 56 हजार चाचण्या झाल्या. आता ही संख्या 5 लाख 75 हजारांवर गेली आहे. विशेष म्हणजे मीनाताई ठाकरे रुग्णालयातील दुसर्‍या मजल्यावर 11 दिवसांत उभारण्यात येणारी ही प्रयोगशाळा 1800 चौरस फूट क्षेत्रात आहे. गेले 14 महिने ही प्रयोगशाळा अव्याहत सुरू असून कोणत्याही दिवशी ती बंद ठेवण्यात आलेली नाही. ही प्रयोगशाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेला खाजगी व शासकीय प्रयोगशाळांवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे चार दिवस अहवाल येण्यास विलंब लागत होते. या प्रयोगशाळेतून मात्र 24 तासांत अहवाल प्राप्त होत आहेत.

सीसीआर निधीचा वापर

विशेष म्हणजे चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी पालिकेने यासाठी आपल्या तिजोरीवर भार टाकलेला नाही तर त्यासाठी व्यवसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधी वापरला जाणार आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील सर्वात जुन्या जनित्र उत्पादन करणार्‍या सिमेन्स कंपनीने ही चाचणी क्षमता वाढविण्यासाठी आर्थिक हातभार लावला आहे. करोना साथ संपुष्टात आल्यानंतर ही प्रयोगशाळा एचआयव्ही, कर्करोग यांसारख्या आजारांचे प्राथमिक निदान करण्यास मदत होणार आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply