पनवेल ः वार्ताहर
ज्येष्ठ कामगार नेते स्व. श्याम म्हात्रे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि. 7) आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सर्वपक्षीय नेत्यांनी म्हात्रे यांच्या आठवणी जागवत त्यांना आदरांजली वाहिली.
या वेळी बोलताना भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, संघर्ष हा कामगार नेते श्याम म्हात्रे यांचा स्थायीभाव होता. त्यांनी कधीही यशापयशाची पर्वा केली नाही. त्यांचे जीवनच संघर्ष करण्यात गेले. ते कधीही स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी समाज जोडलेला होता. त्यामुळे जनता त्यांची सदैव ऋणी राहील.
कामगार नेते दिनेश पाटील यांनीही विचार मांडले. उपस्थितांचे आभार मानताना कोकण श्रमिक संघटनेच्या श्रुती म्हात्रे यांनी सांगितले की, स्व. श्याम म्हात्रे त्यांच्या कार्यामुळे जनतेच्या मनात बसले आहेत. जनकल्याण हेच ध्येय उरासी बाळगून त्यांनी जनतेची सेवा केली.
एकटा कॅटेलिस्ट आणि कोकण श्रमिक संघ यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास हिंद मजदूर सभा संघटनेचे अॅड. संजय वढावकर, वैजनाथ ठाकूर, संजीव म्हात्रे, जे. डी. तांडेल, निर्मला म्हात्रे, शिवसेनेचे रामदास शेवाळे, पंकज भगत, एकनाथ ठोंबरे आदींसह कामगार उपस्थित होते. कोरोना काळात ज्या कामगारांनी जनतेची सेवा केली त्यांना या वेळी गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे मार्ग सुखाचा या विषयावर संजीवन म्हात्रे यांचे व्याखान झाले.