पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे शाखेत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही. एस. वेटम यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. मराठी दिनाचे महत्त्व तनिषा राय, रंजना जैसवार, अंकिता सरोज, रिद्धी पवार यांनी सांगितले. तसेच मराठी भाषेची थोरवी गाणारे गीते नागेश मुंडे, दीपाली सोनकांबळे व सहकारी यांनी गायली. उपशिक्षक जी. बी. पाटील यांनी मराठी राजभाषा दिनाचे महत्त्व सांगत मराठी भाषा दिनाचा उत्सव साजरा करताना मराठीचे मराठीपण, मान-सन्मान, भाषेचा विकास जपण्यासाठी एक दिवस पुरेसा नाही. मराठीचा मान रोजच कसा राखला जाईल हे पाहायला हवे.
विज्ञान दिनाचे महत्त्व आदित्य कांबळे व गीता जाधव यांनी सांगितले. या वेळी उपशिक्षिका के. एम. मालुसरे, एस. ए. भोसले, उपशिक्षक डी. के. म्हात्रे यांनी विज्ञान दिनाची माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी प्रकाशाचे विकिरण, पाण्याची घनता, हवेचा दाब, पाण्याचा उत्कलन, कार्बनला उष्णता दिल्यास उज2 तयार होतो व आम्लधर्मी असतो, आरशातील प्रतिमा असे विविध प्रयोगाचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. या वेळी विज्ञान प्रदर्शन रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास विशेष मार्गदर्शन उपशिक्षिका एस. बी. काळे, एम. डी. महाजन यांचे लाभले. प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख एच. एन. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन रोशनी जैसवार व सुजाता राठोड यांनी केले.