खालापूर, खोपोली : प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन वाहने जळाल्याच्या घटना घडल्या आहेत.
पहिली घटना गुरुवारी (दि. 7) रात्री रात्री 11च्या सुमारास मुंबई लेनवर तर दुसरी घटना शुक्रवारी (दि. 8) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या दोन्ही घटनांत जीवितहानी झाली नाही, मात्र कार जळून खाक झाल्या.
द्रुतगती महामार्गावरुन चाललेल्या डस्टर (एमएच 48-एटी 1366) कारला गुरुवारी रात्री 11वाजण्याच्या सुमारास खालापूर टोल नाक्याजवळ फुडमॉल परिसरात आग लागली. त्याचा अंदाज येताच चालकाने प्रसंगावधान दाखवून कार थांबविली. त्यामुळे कारमधून प्रवास करणारे चौघे सुखरूप बाहेर पडले. त्यानंतर कार जळून खाक झाली.
दुसरी घटना खालापूर टोलनाक्याजवळील पालीफाटा ब्रीजदरम्यान घडली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास सिमेंट वाहून नेणार्या बल्करचा लायनर जॅम झाल्याने उजव्या बाजूच्या मागील टायर्सना आग लागली. या घटनेची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, वाहतूक पोलीस आणि डेल्टा फोर्सचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केल्याने आग आटोक्यात आली.