कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यातील नेरळजवळील भडवळ येथील टॅक्सीचालक सचिन पाटील (वय 40) यांनी आर्थिक बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केली आहे. पाटील यांनी सोमवारी (दि. 28) सायंकाळी सहाच्या सुमारास गावाच्या बाहेर माळरानावर असलेल्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
नेरळ-माथेरानदरम्यान टॅक्सी वाहतूक करणार्या संघटनेमध्ये स्थानिक तरुण चालक म्हणून प्रवासी पर्यटकांची वाहतूक करीत असतात. त्यात भडवळ गावातील सचिन नीळकंठ पाटील हा तरुण गेली अनेक वर्षे टॅक्सी वाहतूक करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवित होता. कोरोनामुळे माथेरान पर्यटनस्थळ हे लॉकडाऊनपासून गेले सहा महिने बंद होते. यामुळे टॅक्सीचालकांचा व्यवसाय बुडाला असून, चालकांवर उपासमारीची वेळ आली. आता माथेरानमधील पर्यटन व्यवसाय सुरू झाला आहे, मात्र प्रवासी वाहतूक करणार्या टॅक्सीचालकांना आजही व्यवसाय नाही.त्यामुळे आर्थिक संकटात आलेले सर्व चालक नेरळ गावात मच्छी विकासापासून अनेक प्रकारचे व्यवसाय करतात, मात्र तरीही कुटुंब चालवायचे कसे या विवंचनेत असलेल्या सचिन पाटील यांनी टोकाचा निर्णय घेत गळफास लावून आत्महत्या केली.
भडवळ गावातील तरुण माळरानावर क्रिकेट खेळण्यासाठी नेहमीप्रमाणे गेले होते. त्या वेळी त्यांना तेथील एका झाडाला लटकलेल्या स्थितीत सचिन पाटील यांचा मृतदेह दिसला. नंतर ग्रामस्थांनी पोलिसांना पाचारण करून सचिन पाटील मृतदेह झाली उतरवला.पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.