पनवेल : रामप्रहर वृत्त
रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर, तसेच रोटरी क्लब ऑफ उलवे नोड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कलासागर परिवारनिर्मित आयोजित स्वर्गीय किशोर कुमार यांना श्रद्धांजली अर्पित करण्याच्या ‘गाता रहे मेरा दिल’ या कार्यक्रमात बहारदार किशोर गीतांचा अनुभव श्रोत्यांना अवर्णनीय आनंद देऊन गेला. या कार्यक्रमात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. आयोजक रवी नाईक आणि श्रीकांत मुंबईकर यांनी गायक, अभिनेते, निर्माते, संगीत दिग्दर्शक स्वर्गीय किशोर कुमार यांच्या स्मृतिदिनी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माजी नगरसेविका वर्षा नाईक, रवी नाईक यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाला मूर्त रूप देण्यात आले. पनवेलच्या मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात हा बहारदार कार्यक्रम झाला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपण सारे यापूर्वी कोरोना कालखंडातून गेलो आहोत. आपल्यातून अनेक जवळच्या लोकांनी न सांगता जगाचा निरोप घेतला आहे. या संघर्षमय कालखंडात टिकून राहत असताना आपण सार्यांनीच छंद, व्यासंग यांचा अवलंब केला. संगीत या छंद प्रकाराचा आपल्याला एक हक्काचा सहारा होता, असे सांगताना कार्यक्रमाच्या आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय किशोर कुमार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहात सर्व गायकांचे कौतुक केले. रवी नाईक, नरेश बुल्लू, गोपाळ पाटील, किशोर गवादे, जीतू पाटील, श्री. गिरी, पी. सी. म्हात्रे, कृष्णा नाईक, समाधान पाटील, राज नाईक, सिनियर आरटीओ निरीक्षक निलेश बनसोडे यांनी बहारदार आवाजात स्वर्गीय किशोर कुमार यांची गीते सादर केली, तर दया बाबरे, सोनल नाईक, सरिताजी यांनी युगल गीतांना साथ दिली. डॉ. गवादे यांनी स्त्री व पुरुष अशा दुहेरी आवाजात गाणे गात धमाल उडवून दिली. संजय साउंड सर्व्हिसेस यांनी उत्तमप्रकारे ध्वनी नियोजन केले. राजन म्हात्रे यांच्या प्रकाश योजनेने कार्यक्रमात रंगत भरली. हा कार्यक्रम फेसबुक, तसेच अन्य समाज माध्यमांवर थेट प्रदर्शित करण्यात आला होता. हजारो दर्शकांनी कार्यक्रमाचा सोशल मीडियावर आनंद लुटला. अजित काकडे यांनी थेट प्रक्षेपण दाखवत प्रेक्षकांना अप्रतिम कार्यक्रमाचा आनंद दिला. रितेश तिवारी यांच्या खुमासदार शैलीतील निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली. सह़निर्माते पुरषोत्तम म्हात्रे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला नगरसेवक तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका नीता माळी, भाजप उत्तर रायगड जिल्हा संघटक सरचिटणीस अविनाश कोळी, रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर सुनील कुरूप, रोटरी क्लब ऑफ रसायनीचे प्रेसिडेंट गणेश काळे, रोटरी क्लब ऑफ खोपोलीचे प्रेसिडेंट सुरेश खेडकर, रेश्मा कुरूप, अलका कोळी, पुरण सिंग मेहरा, सुवर्णा पाटील, सिटी बेलचे समूह संपादक मंदार दोंदे, विवेक पाटील आदी उपस्थित होते.