दुबई ः वृत्तसंस्था
फॅफ ड्यू प्लेसिसच्या (86) उत्कृष्ट फलंदाजीनंतर शार्दूल ठाकूरने (3/38) केलेल्या भेदक मार्यामुळे चेन्नई सुपर किंग्जने अंतिम सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सला 27 धावांनी धूळ चारत इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटच्या 14व्या हंगामाचे जेतेपद पटकावले. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणार्या चेन्नईचे हे चौथे आयपीएल जेतेपद ठरले.दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नईने दिलेल्या 193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला 20 षटकांत 9 बाद 165 धावाच करता आल्या. दोन वेळा विजेत्या कोलकाताची आयपीएलचा अंतिम सामना गमावण्याची ही पहिलीच वेळ होती. यंदा उल्लेखनीय कामगिरी करणार्या वेंकटेश अय्यर (50) आणि शुभमन गिल (51) या युवा सलामीवीरांनी आक्रमक शैलीत फलंदाजी केली, परंतु शार्दूलने सलग दोन चेंडूंत अय्यर आणि नितीश राणा यांना बाद केले तसेच दीपक चहरने गिलला पायचीत केले. त्यामुळे बिनबाद 91 अशा धडाकेबाज प्रारंभानंतर कोलकाताने 24 धावांत आठ बळी गमावले आणि त्यांच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. तत्पूर्वी, ‘एलिमिनेटर’ आणि ‘क्वालिफायर-2’च्या सामन्यात धावांचा यशस्वी पाठलाग करणार्या कोलकाताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारल्यावर चेन्नईने 20 षटकांत 3 बाद 192 अशी धावसंख्या उभारली. फॅफ (86) आणि ऋतुराज गायकवाड (32) यांनी चेन्नईला चांगली सुरुवात मिळवून दिली. त्यांनी आठ षटकांत 61 धावांची भागीदारी रचल्यावर फिरकीपटू सुनील नारायणने ऋतुराजला माघारी पाठवले. मग फॅफला रॉबिन उथप्पाची (31) उत्तम साथ लाभली. उथप्पाने फिरकी त्रिकुटाच्या गोलंदाजीवर प्रत्येकी एक षटकार मारला, मात्र नारायणच्या गोलंदाजीवर तो पायचीत झाला. फॅफ आणि मोईन अली (नाबाद 37) यांनी अखेरच्या पाच षटकांत फटकेबाजी करीत 61 धावा काढल्याने चेन्नईने 190 धावांचा टप्पा ओलांडला. फॅफने 59 चेंडूंत 86 धावांची खेळी करताना सात चौकार व तीन षटकार मारले.
संक्षिप्त धावफलक – चेन्नई सुपर किंग्ज : 20 षटकांत 3 बाद 192 (फॅफ ड्यू प्लेसिस 86, मोईन अली नाबाद 37, ऋतुराज गायकवाड 32; सुनील नारायण 2/26) विजयी वि. कोलकाता नाइट रायडर्स 20 षटकांत 9 बाद 165 (शुभमन गिल 51, वेंकटेश अय्यर 50; शार्दूल ठाकूर 3/38, जोश हेझलवूड 2/29).
ऑरेंज कॅप : ऋतुराज गायकवाड (चेन्नई) ः 635 धावा, पर्पल कॅप : हर्षल पटेल (बंगळुरू) : ः 32 बळी