Breaking News

तुफानी तेजीमध्ये असा आहे भारतीयांच्या एसआयपीचा वाटा!

भारतीय गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक मार्गात झालेले बदल, विशेषतः एसआयपीच्या मार्गाने दर महिन्याला येणारा पैसा आणि शेअर बाजारातील सध्याच्या तुफानी तेजीचा जवळचा संबंध आहे. जगभर गुंतवणुकीसाठी अवलंबला जात असलेला हा मार्ग भारतीय गुंतवणूकदार स्वीकारताना दिसत आहेत, हे निश्चितच स्वागतार्ह होय.

भारतीय नागरिकांच्या गुंतवणुकीच्या मार्गांमध्ये जे बदल होत आहेत, त्यावर अनेक मार्गांनी शिक्कामोर्तब होते आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक हा आतापर्यंत सर्वसामान्य भारतीय गुंतवणूकदारांच्या दृष्टीने लांबचा विषय होता, पण डिजिटल व्यवहारांना मिळालेली गती, आर्थिक साक्षरतेसाठी होत असलेले प्रयत्न आणि कोरोना संकट यामुळे तोही आता भाग घेताना दिसतो आहे. गेल्या दोन वर्षांत असे सुमारे दीड कोटी गुंतवणूकदार थेट शेअर बाजारात गुंतवणूक करू लागले आहेत. कोरोना संकटामुळे सर्व व्यवहार मंदावले असताना या गुंतवणुकीचा त्यांना आधार वाटला. हा बदल एका धक्क्यातून झाला असला तरी त्याचे स्वागत केले पाहिजे, कारण गुंतवणुकीला सर्वाधिक परतावा देणारा हा मार्ग अजूनही कोट्यवधी गुंतवणूकदारांपासून दूर आहे. पुरेशी माहिती न घेता शेअर बाजारात येणारे नागरिक पैसा गमावून बसतात, ही वस्तुस्थिती आहे, मात्र कधीतरी त्याला तो मार्ग कळला पाहिजे, याविषयी दुमत असू शकत नाही.

एसआयपीत प्रथमच एवढी वाढ

अर्थात, सर्वच नवे गुंतवणूकदार शेअर बाजारात थेट उडी घेत नाहीत हेही लक्षात घेतले पाहिजे. याकाळात जेव्हा त्यांना शेअर बाजाराचे आकर्षण वाटले तेव्हा त्यातील बहुतेकांनी शेअर बाजारात अप्रत्यक्ष गुंतवणुकीचा मार्ग निवडला आहे. तो आहे म्युच्युअल फंडाचा. म्युच्युअल फंडात किती नागरिक गुंतवणूक करत आहेत, यासंबंधीची दर महिन्याला आकडेवारी प्रसिद्ध होते. सप्टेंबर 2021ची अशी आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध झाली असून ती अतिशय बोलकी आहे. दर महिन्याला ठराविक रक्कम म्युच्युअल फंडामध्ये टाकत राहण्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपी म्हटले जाते. गुंतवणुकीचा हा मार्ग जगभर अनुसरला जातो. भारतातही अलीकडच्या काही वर्षांत त्यात सातत्याने वाढ होताना दिसते आहे. गेल्या महिन्यात एसआयपी नोंदणीची संख्या 21 लाखांच्या घरात गेली आहे. ही नोंद नेहमीच्या सरासरीच्या अडीच पट अधिक आहे. 20 लाखांच्या वर एसआयपी सुरू होण्याचा हा सलग चौथा महिना आहे हे विशेष. म्हणजे गेल्या चार महिन्यात एसआयपीची संख्या 77 लाखांच्या घरात गेली आहे. एक एसआयपी म्हणजे प्रत्येक वेळी एक नवा गुंतवणूकदार असे नसते. काही गुंतवणूकदार अनेक एसआयपी करत असतात, असे असले तरी ही वाढ महत्त्वाची आहे, कारण या प्रकारची वाढ भारतात यापूर्वी कधी झालेली नाही.

 विदेशी बाजारांचा प्रभाव कमी झाला

भारतीय नागरिक शेअर बाजारात वेगवेगळ्या मार्गांनी गुंतवणूक करत आहेत. याचा आणखी एक चांगला पैलू आहे तो म्हणजे भारतीय शेअर बाजार हा पूर्णपणे जगातील इतर बाजारांवर अवलंबून राहात आला आहे. तसेच परकीय गुंतवणूकदारांच्या भांडवलावर त्याची तेजी मंदी ठरत आलेली आहे, मात्र गेल्या सहा महिन्यांत यात थोडा फरक पडला आहे. उदा. परकीय गुंतवणूदार अजून मोठ्या संख्येने भारतीय बाजाराकडे वळले नसल्याने त्यांची गेल्या सहा महिन्यांतील गुंतवणूक फक्त आठ हजार 259 कोटी रुपये आहे. त्यामुळे बाहेरच्या बाजारांचा भारतीय बाजारावरील प्रभाव कमी झाल्याचे या सहा महिन्यांत पाहायला मिळाले. देशातील गुंतवणूकदारांचा वाटा आतापर्यंत किरकोळ मानला जात होता, तो आता तसा राहिला नाही. ही भारतीय बाजारावरील भारतीय गुंतवणूकदारांचा विश्वास वाढविणारी गोष्ट आहे.

 नव्या गुंतवणूकदारांना इशारा

अर्थात, हे सर्व आकडे चांगले असले तरी गुंतवणूकदारांनी सावधानतेचा इशारा लक्षात ठेवला पाहिजे. तो म्हणजे बाजार आता इतका वर आहे की तो कधी आणि किती किती खाली येईल, याची चर्चा सुरू झाली आहे. तशा बातम्या काही माध्यमांमध्ये येऊ लागल्या आहेत. त्याचा फटका आपल्याला बसू नये, याची काळजी नव्या गुंतवणूकदारांनी घेतली पाहिजे. काळजी घ्यायची म्हणजे जी रक्कम नजीकच्या काळात लागणार आहे ती बाजारातून काढून घेणे आणि बँकेत असेल, अशी व्यवस्था करणे. ज्यांना नजीकच्या काळात रक्कम नको आहे त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. कारण नवे गुंतवणूकदार, एसआयपी आणि वेग घेत असलेली भारतीय अर्थव्यवस्था बाजार असाच हलता ठेवण्याची व्यवस्था करत आहे आणि यापुढेही करत राहणार आहेत.

तेजीचा आणि एसआयपीचा संबंध

कोरोना संकटातून भारतीय अर्थव्यवस्था वेगाने बाहेर येते आहे, मात्र तिचा वेग काही शेअर बाजारातील तुफान तेजी इतका असू शकत नाही, हे समजण्यासारखे आहे. मात्र त्या तेजीच्या मागेही एसआयपीच्या मार्गाने वाढलेली गुंतवणूक ही कशी आहे, याची प्रचीती आणखी काही आकडे देतात ते असे. एकतर एसआयपीच्या मार्गाने दर महिन्याला शेअर बाजारात सप्टेंबरमध्ये 10 हजार 351 कोटी रुपये आले. गेले काही महिने हा आकडा आठ ते नऊ हजार कोटी रुपयांच्या मध्ये होता. दुसरे म्हणजे गेल्या पाच वर्षांचा विचार केल्यास यावर्षी या मार्गाने होणारी गुंतवणूक सरासरी 22.8 टक्क्यांनी अधिक आहे. तिसरे म्हणजे या एसआयपींचे व्यवस्थापन करणार्‍या कंपन्यांकडे या मार्गाने येणारी रक्कम सातत्याने वाढताना दिसते आहे. या कंपन्यांकडील असा एकूण निधी सप्टेंबरमध्ये 5.44 लाख कोटींवर गेला आहे. बाजारातील तुफान तेजीचा आणि याचा कसा संबंध आहे पहा. गेल्या सहा महिन्यांत एसआयपीच्या मार्गाने 56 हजार 452 कोटी रुपये बाजारात आले. (त्यातील 90 टक्के रक्कम इक्विटी फंडांत आली आहे.) एसआयपीच्या मार्गाने बाजारात आलेली ही आतापर्यंतची सर्वोच्च रक्कम आहे. बाजारातील तुफान तेजीही गेल्या सहा महिन्यांतील आहे हे लक्षात घ्या.

भारताच्या विकासदराची साथ

आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांनी आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या जीडीपी वाढीचा जो अंदाज (9.5 टक्के) वेळोवेळी जाहीर केला आहे तोही उत्साहवर्धक ठरला आहे. अशा आकडेवारीमध्ये नेहमी इतका फरक असतो की त्यातील कोणती खरी मानावी, असा प्रश्न अनेकदा पडतो, पण योगायोगाने आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था, नाणेनिधी आणि रिझर्व बँक यांनी अंदाज केलेला विकासदर साधारण एवढाच आहे. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवण्यास हरकत नाही. तो जगातील इतर देशांशी तुलना करता सर्वाधिक आहे.शेअर बाजार उद्याचा विचार करतो हे गृहीतक मान्य करावायचे झाले तर शेअर बाजाराला नजीकचा भविष्यकाळ चांगला वाटतो, असे मानण्यास हरकत नाही.

-यमाजी मालकर, अर्थप्रहर

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply