नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने कोलकाताविरुद्धच्या अंतिम सामन्यात अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. ट्वेण्टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून धोनीचा हा 300वा सामना होता आणि ही कामगिरी करणारा तो जागतिक क्रिकेटमधील पहिलाच खेळाडू ठरला आहे. धोनीने चेन्नईचे 214 सामन्यांत नेतृत्व केले असून त्याने एका आयपीएल हंगामाच्या 14 सामन्यांत रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे कर्णधारपद भूषवले होते तसेच त्याने भारताचा कर्णधार म्हणून 72 सामने खेळले. त्याच्या नेतृत्वात भारताने 2007 साली झालेला पहिलावहिला ट्वेण्टी-20 विश्वचषक जिंकला होता. दरम्यान, कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेला कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणार्या चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सला हरवत आयपीएल जेतेपद पटकावले. या आनंदासोबतच धोनीच्या चाहत्यांना अजून एक चांगली बातमी मिळाली आहे. धोनी पुन्हा एकदा बाबा होणार असल्याचे समोर आले आहे.