Breaking News

कथा अलिबागच्या पांढर्या कांद्याची!

जिल्ह्यातील अनेकांनी आपल्या कर्तृत्वाने रायगडच्या नावलौकिकात भर टाकली आहे. अलिकडेच अलिबागच्या पांढर्‍या कांद्यानेदेखील भौगोलिक मानांकन प्राप्त करून देशविदेशात रायगड जिल्ह्याची ओळख निर्माण करण्यासाठी गरूडझेप घेतली आहे. अलिबागच्या पांढर्‍या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी करूणा नवलकर या उच्चशिक्षित महिलेने पुणे येथील ’जीएमजीसी’ कंपनीचे प्रमुख व भौगोलिक निर्देशांक (जीआय) विषयातील तज्ज्ञांकडे पाठपुरावा केला. तसेच त्यांनी या पांढर्‍या कांद्याला मोठमोठ्या मॉल्स आणि बाजारपेठांमध्ये ओळख मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याची माहिती या जीआय मानांकनाच्या निमित्ताने प्राप्त झाली.

पांढरे कांदे अलिबागमध्ये अनेक वर्षांपासून फक्त पारंपरिक आणि अस्सल बियांसह घेतले जातात. त्याच्या लागवडीचे ऐतिहासिक दाखले 1883 या वर्षीच्या कुलाबा गॅझेटमध्ये पाहायला मिळतात. अलिबाग तालुक्यातील नेऊली, खंडाळे, कार्ले, वाडगाव आदी आठ गावात या कांद्याची लागवड केली जाते. हा कांदा उन्हाळयातील दोन ते तीन महिनेच बाजारात विक्रीसाठी असतो. याच कालावधीत शेतकरी स्वत:च पुढील वर्षांतील लागवडीसाठी कांद्याचे बियाणे तयार करतात. पूर्वी पारंपरिक पध्दतीने या पिकाची लागवड केली जात असे. आता नवे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. मातीच्या संरचनेमुळे त्यात एक विशेष चव आणि रंग आहे, आणि बाजारात उपलब्ध असलेल्या इतर सामान्य पांढर्‍या कांद्यापेक्षा अलिबागचा पांढरा कांदा वेगळा आहे. त्याला सामान्य कांद्यासारखा तीव्र वास येत नाही. आयुर्वेदानुसार अलिबागच्या पांढर्‍या कांद्याचा औषधी उपयोग खोकला, सर्दी, ताप, एलर्जी, कर्करोग, निद्रानाश, संधिवात, कान दुखणे, पार्किन्सन, अल्झायमर, मूड सुधारणे, त्वचा आणि केसांचे आरोग्य राखणे, नाकातून रक्त येणे, रक्तस्त्राव विकार, जळणे, जखम, मधमाशी चावणे इत्यादीमध्ये अँटिसेप्टिक, अँटीबायोटिक, कार्मिनेटिव्ह आणि अँटीमाइक्रोबायल आहे. हा कांदा चवीला अन्य कांद्यापेक्षा गोड, टिकाऊ आहे. महिलांकडून कुशलतेने या कांद्याची माळ किंवा वेणी केली जाते व ती प्रसिध्द आहे. आकर्षक वेणीसारखी आणि लाकडी दांड्यावर साठवणूक केल्या जाणार्‍या पांढर्‍या कांद्याची अनोखी चव आहे. अखंड आणि दीर्घकाळ टिकाऊ ठेवण्यासाठी हे पांढरे कांदे पारंपारिक गुंफलेल्या शैलीमध्ये बांधले आणि साठवले जातात. या पांढर्‍या कांद्यात मिथाईल सल्फाइड आणि अमीनो अ‍ॅसिड असते, ते कोलेस्टेरॉलही नियंत्रणात ठेवते तसेच हृदयाच्या तक्रारी कमी करते. रोज हा कांदा खाल्ल्याने रक्ताची कमतरताही दूर होते. सर्दी किंवा खोकल्याची समस्या असेल तर ताज्या कांद्याचा रस गूळ आणि मध एकत्र करून दिले जाते. मधुमेहींसाठी हा कांदा उपयुक्त आहे.

एक कप चिरलेल्या पांढर्‍या कांद्यामध्ये अंदाजे कॅलरी 64, फॅट 0 ग्रॅम, कार्बोहायड्रेट 15 ग्रॅम, कोलेस्ट्रॉल 0 ग्रॅम, फायबर तीन ग्रॅम, साखर सात ग्रॅम, प्रथिने दोन ग्रॅम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-6 मँगनीजल दैनंदिन मूल्याच्या 10 किंवा त्याहून अधिक, कॅल्शियम, लोह, फोलेट, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम आणि अँटिऑॅक्सिडंटस क्वेरसेटिन आणि सल्फर असे या पांढर्‍या कांद्याचे अंगीभूत गुण आहेत. रायगडचे पांढरे सोने म्हणूनच या पांढर्‍या कांद्याला ओखले जाते. या बहुगुणी कांद्याला जीआय मिळाल्याने भारतातील विविध राज्यांबरोबरच परदेशांतही त्याला बाजारपेठ मिळण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.

अलिबाग भागातील हे पारंपरिक बियाणे आहे. भात काढणी झाल्यानंतर शेतातील ओलाव्याच्या आधारे हा कांदा लावण्यात येतो. अलिबागच्या रुचकर आणि औषधी गुणधर्म असलेल्या पांढर्‍या कांद्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असून केंद्र सरकारने याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा कोलमला  मानांकन मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या पांढर्‍या कांद्यालाही हा दर्जा मिळाल्याने अलिबागमधील शेतकर्‍यांचा उत्साह वाढला आहे.

मार्च महिन्यात पांढरा कांदा विक्रीसाठी तयार होतो. या पांढर्‍या कांद्याला चांगली मागणी असल्यामुळे पुणे व मुंबईतील व्यापारी थेट शेतकर्‍यांकडून पांढरा कांदा खरेदी करतात. त्यामुळे शेतकर्‍यांना फायदा होतो. इतर ठिकाणी पिकणार्‍या पांढर्‍या कांद्यापेक्षा अलिबाग तालुक्यात पिकणार्‍या पांढर्‍या कांद्याला चांगला भाव मिळतो, हा आजवरचा अनुभव आता जीआय मानांकनानंतर बदलण्यास सुरूवात झाली असून अलिबागचा पांढरा कांदा अशी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण झाली आहे.

अलिबागमधील शेतकर्‍यांनी या पांढर्‍या कांद्याचे शुध्द बियाणे संवर्धित केले आहे. या पांढर्‍या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी सातत्याने मागणी केली जात होती. त्यासाठी गेली काही वर्षे शासन स्तरावर प्रयत्न सुरू होते. कृषी विभाग, कोकण कृषी विद्यापीठ, ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी यांच्यात यासाठी एक करार करण्यात आला होता. मुंबई येथील केंद्र सरकारच्या पेटंट रजिस्ट्रार कार्यालयात पांढर्‍या कांद्याला भौगोलिक मानांकन प्रस्तावाची पडताळणी करण्यात आली. या बैठकीत अलिबागच्या पांढर्‍या कांद्याला भौगौलिक मानांकन बहाल करण्यात आले. या मानांकनामुळे अलिबागच्या पांढर्‍या कांद्याला स्वत:ची ओळख मिळाली आहे, अशी माहिती अलिबागच्या मूळरहिवासी चार्टर्ड अकाऊंटंट करूणा नवलकर यांनी दिली. त्यांनी हा कांदा हैदराबाद, चेन्नई, मुंबई, बँगलोर, नवी दिल्ली, अहमदाबाद यांच्यासह भारतातील विविध प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध करून दिला.

पुणे येथील ’जीएमजीसी’ कंपनीचे प्रमुख व भौगोलिक निर्देशांक (जीआय) विषयातील तज्ज्ञ गणेश हिंगमिरे, रायगड कृषी विभाग, आत्माअंतर्गत प्रकल्प अधिकारी दिनेश शेळके, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील जितेंद्र कदम यांनीही पांढर्‍या कांद्याच्या जीआय मानांकनासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. सप्टेंबर 2019 ला आत्माच्या पुढाकाराने अलिबाग पांढरा कांदा शेतकरी उत्पादक गटाची स्थापना झाली आणि पांढरा कांदा संकलनाची तसेच विविध व्यापार केंद्रांमध्ये उपलब्ध करून देण्याची सुरूवात झाली. यामुळेच करूणा नवलकर यांच्या प्रयत्नांना आता मोठ्या प्रमाणात यश मिळण्यास सुरूवात झाली आहे.

अलिबागच्या पांढर्‍या कांद्याचे पीक यापुढे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर घेण्यासाठी शेतकर्‍यांना प्रवृत्त करणे आणि वाढती मागणी लक्षात घेऊन पाढर्‍या कांद्याची  तरतूद करणे हा यामागचा हेतू असल्याचे करूणा नवलकर यांनी सांगितले.

-शैलेश पालकर, खबरबात

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply