Tuesday , February 7 2023

पानशेत धरणफुटीचा महाप्रलय

12 जुलै 1961 रोजी म्हणजेच 59 वर्षांपूर्वी पुण्यात पानशेत धरण फुटले आणि महाप्रलय आला. यामुळे सार्‍या महाराष्ट्रावर अवकळा पसरली. त्या वेळी भरपूर पाऊस पडला होता. मुठा नदीला मोठा पूर आला आणि सारे चित्रच बदलले. विधीलिखित चुकत नाही, असे म्हटले जाते. दुर्घटना कधी घडून येतात हे सांगता येत नाही आणि ही दुर्घटना होती नैसर्गिक धरणफुटीची आणि महापुराची. पावसाच्या दिवसांत महापूर येतात आणि जातात. त्यात हानी होते, परंतु मनुष्यहानी कमी होते. पानशेत धरण फुटल्यामुळे जी हानी झाली ती लवकर भरून न येण्यासारखीच. त्या काळी घरोघरी टीव्ही नव्हते. आकाशवाणी (रेडिओ) हे माध्यम उपलब्ध होते. तरीही ते खेडोपाड्यात घरोघरी पसरलेले नव्हते. पानशेत धरण फुटल्याची बातमी आकाशवाणीवर ऐकली आणि लोकांची रेडिओकडे कान लावून बातम्या ऐकण्याची झुंबड उडाली. पानशेत धरण फुटल्याच्या बातम्या ऐकून अंगावर काटा उभा राहत असे. त्या वेळी आतासारखी वर्तमानपत्रेही भाराभर नव्हती, तर मोजकीच होती. तीसुद्धा ग्रामीण भागात मिळणे कठीण होती. पानशेत धरणातील पाण्याच्या प्रचंड लोटामुळे खडकवासला धरणावर ताण पडून काही भाग फुटला आणि मुठा नदीला महापूर आला. या धरणफुटीने पुण्यात हाहाकार उडाला. यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. वित्तहानीही झाली. मालमत्ता, झाडे, घरेदारे, जनावरे वाहून गेली. कृष्णाची द्वारका बुडावी तसा प्रकार पुण्यात घडला. या प्रलयामुळे शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. वीज आणि पाणीपुरवठा यंत्रणा बंद झाली. पुण्यातील लाकडी पूल वाहून गेले. 13 जुलैला पूर ओसरला. काही अभागी कुटुंब आपले काही शिल्लक आहे का ते शोधू लागले, मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. येथील पूरग्रस्तांचे बर्‍याच प्रमाणात पुनर्वसन झाले. काही आश्वासित तसेच राहिले. गावांचे पुनर्वसन म्हणजे माहेरहून सासरी गेल्यासारखेच असते. पुण्यातील पानशेतच्या प्रलयाने उडविलेला हाहाकार अजूनही अनेकांच्या स्मरणात आहे. त्या प्रलयाला 59 वर्षे पूर्ण झाली. ज्या पुण्यातील लोकांनी हा प्रलय पाहिला, अनुभवला त्यांचे आजच्या दिवसाला मन थरारून उठेल, अंगावर काटा उभा राहील. आता पुण्याचं सोनं झालंय. या महानगराचा विस्तार वाढला, पण मुठा नदीचे पात्र घटत चाललंय. नदीच्या बाजूची धूप होते म्हणून संरक्षक कठडे बांधले जातात, मात्र आताच्या जमान्यात नदीच्या काठाच्या शेजारी टपर्‍या, झोपड्या उभ्या करून नदीचे पात्रच गिळंकृत करतात. पानशेत धरण फुटून आलेला पूर हा किती अक्राळविक्राळ होता याची पुणेकरांना जाण आहे. चांगल्या घटना घडतात त्याचे रौप्य, सुर्वण महोत्सव साजरे होतात, पण वाईट घटनांचे महोत्सव साजरे न करता त्या घटनेची जाणीव तरुण पिढीला करून देणे हाच उद्देश असतो आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उपाययोजना करणेही महत्त्वाचे असते.

-धनंजय गोंधळी, चिरनेर, उरण

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply