Breaking News

बोर्ले गावातील अपरिहत बालकाची हत्या; आरोपीला अटक

माणगाव,  धाटाव : प्रतिनिधी

तालुक्यातील बोर्ले गावातून अपहरण केलेल्या रुद्र यादव या दोन वर्षांच्या चिमुरड्याची हत्या करून पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी सिल्व्हासा (गुजरात) येथून ताब्यात घेतले असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

आरोपी संतोष अशोक यादव (वय 30, रा. बोर्ले, ता. माणगाव) याने 26 ऑक्टोबरला सायंकाळी बोर्ले गावातील सुनील यादव यांच्या घराच्या अंगणातून रुद्र अरुण यादव (वय दोन वर्षे तीन महिने) या चिमुरड्याला जबरदस्तीने पळवून नेले होेते. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात भादवि कलम 363,302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर करीत होते.

दरम्यान, आरोपी संतोष यादव याने रुद्र यादव याची हत्या करून त्याचा मृतदेह चणेरा रस्त्यालगत आरे (ता. रोहा) गावच्या हद्दीत टाकून पळ काढला होता. आरोपीचे काही नातेवाईक गुजरातमध्ये राहायला असल्याची माहिती तपासामध्ये पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सिल्व्हासा (गुजरात) येथील एका घराजवळ गुरुवारी (दि. 28) सापळा रचून पोलिसांनी आरोपी संतोष यादवला ताब्यात घेतले. माणगावला आणल्यानंतर अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

रुद्र यादव या चिमुरड्याच्या हत्येच्या संतापजनक घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरला असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply