सहकार्य करण्याचे पोलिसांचे आवाहन

नागोठणे : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या काळातच विविध उत्सव येत असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उत्सव समित्यांचे पदाधिकारी, सदस्य तसेच नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांनी केले.
लोकसभा निवडणुकीचे मतदान 23 एप्रिलला होत असून त्याच दरम्यान, हनुमान जयंती, जोगेश्वरीमातेचा पालखी सोहळा तसेच हजरत मिरामोहिद्दीन शाहबाबा यांचा उरूस सोहळा संपन्न होत आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने अनेक प्रकारची बंधने आली असल्याने त्यासंदर्भात गायकवाड यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्यासह उत्सव समिती, उरूस समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
हनुमान जयंती 19 एप्रिल, जोगेश्वरीमातेचा पालखी सोहळा 20 ते 22 एप्रिल आणि उरूस सोहळा 22 ते 23 एप्रिल दरम्यान होत असताना 23 एप्रिलाच लोकसभेचे मतदान होत असल्याने पोलीस यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त होणार आहे. त्यामुळे उत्सवासाठी पोलीस बंदोबस्त देणे अशक्यप्राय बाब असल्याचे गायकवाड यांनी बैठकीत स्पष्ट केले.
रात्री दहानंतर वाद्य वाजविण्यास तसेच ध्वनिक्षेपक बंदी राहणार असून निवडणुकीसाठी नेमण्यात आलेले भरारी पथक कधीही येथे येण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडून काही तक्रार नोंदविण्यात आली तर, पोलिसांना नाईलाजाने गुन्हा दाखल करावा लागेल, असे त्यांनी सांगितले. मतदानामुळे पालखी तसेच उरूस सोहळ्यासाठी पोलीस बंदोबस्त देता येत नसल्याने संबंधित उत्सव समितीने स्वयंसेवक नेमून बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन गायकवाड यांनी या बैठकीत केले.