कंपनीविरोधात आवाज उठवणार -अॅड. महेश मोहिते
धाटाव : प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील ऐल्पे केमिकल्स कंपनीत शनिवारी दोन कामगार भाजले. या कंपनीत वारंवार अपघात होत असल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी भाजप आवाज उठवणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी सांगितले. ते पत्रकारांशी बोलत होते.
रोहा इंडस्ट्रीज असोसिएशनचचे अध्यक्ष पी. पी. बारदेशकर यांच्या मालकीच्या ऐल्पे केमिकल्स कंपनीत दोन महिन्यांपूर्वी एका कामगाराला आपली दोन बोटे गमवावी लागली होती. तर शनिवारी दोन कामगार भाजले आहेत. मात्र त्याबाबत अधिकृत माहिती देण्यास कंपनी व्यवस्थापन टाळाटाळ करीत आहे.
दरम्यान, ऐल्पे कंपनीतील दुर्घटना काही पत्रकारांनी दूरध्वनीद्वारे भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी अॅड. मोहिते म्हणाले की, ऐल्पे केमिकल्स कंपनीत अपघातांची मालिका सुरू आहे. तेथील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याकडे आगामी हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात येईल तसेच कंपनीविरोधात आवाज उठवणार असल्याचे अॅड. मोहिते यांनी पत्रकारांना सांगितले
ऐल्पे केमिकल्समध्ये शनिवारी अपघात झाला, त्यात दोन कामगार भाजले, त्यांना ऐरोली येथील नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघाताबाबत कारवाई करुन कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात येईल.
–अजित मोहिते, फॅक्टरी इन्स्पेक्टर, मुंबई